महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागात किती विकासकामे करू आणि किती नको, यासाठी उतावीळ बनलेल्या काही नगरसेवकांनी प्रभागातील चांगली कामे उखडून तीच कामे पुन्हा करण्याचा सपाटा लावला आहे. कल्याणमधील ठाणकरपाडा येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानात सुस्थितीतील जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकवर पावसाळ्यात पाणी साचते असे कारण महापालिकेकडून पुढे करण्यात आले. काही दिवसांपासून हा ट्रॅक उखडून तो नव्याने बांधण्यात येत असल्याने या भागातील रहिवाशांमध्ये तसेच उद्यानात नियमित येणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. माजी आमदार प्रकाश भोईर यांनी चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चुन रमाबाई आंबेडकर उद्यानाची उभारणी केली आहे. काही दिवसांपासून रमाबाई उद्यानातील जॉगिंग ट्रॅक महापालिकेच्या ठेकेदाराने खणून काढला आहे. लोकांनी विचारणा केल्यावर या ट्रॅकवर पावसाळ्यात पाणी साचते म्हणून तो दुरुस्त करण्यात येत असल्याचे कारण देण्यात आले. जॉगिंग ट्रॅकवरील पेव्हर ब्लॉक काढून तेच पुन्हा सिमेंटचे थर लावून बसवण्यात येत आहेत. ११२ पैकी ८० नगरसेवकांच्या प्रभागात गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी बांधलेली गटारे, पदपथ तोडून ते केवळ मंजूर निधी खर्चण्यासाठी नव्याने बांधकाम सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.