नव्या वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहतूक शाखेला पत्र

किशोर कोकणे

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीचा पुन्हा एकदा घाट घालण्यात आला आहे. मुंब्रा बाह्यवळणाच्या पुलावरील ६०० मीटर पोहोच रस्त्यावर जाड काँक्रीटचा थर बसविण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यासंदर्भाची निविदा येत्या दोन ते तीन आठवडय़ांत काढली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली. ही दुरुस्ती करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगीचे पत्र ठाणे वाहतूक शाखेस दिले आहे. गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्रा बाह्यवळण मार्गाची दोन वेळा मोठी दुरुस्ती केली आहे. या दरम्यान महानगर प्रदेशात मोठय़ा कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले होते. वारंवार होणाऱ्या या दुरुस्ती कामांमुळे बांधकाम विभागाच्या कामकाजाविषयी शंका व्यक्त केली जात आहे.  हजारो वाहने मुंब्रा बाह्यवळणमार्गे वाहतूक करत असतात. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण दिवसाला सरासरी १५ हजार इतके आहे. तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील काही भागांच्या दुरुस्तीचे काम हाती  घेतले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता. तर रेतीबंदर उड्डाणपुलाच्या भागातील काही रस्त्याची अद्यापही पूर्णपणे दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे येथील उड्डाणपुलाच्या भागात पावसाळ्यामध्ये दरवर्षी खड्डे पडत असतात. अवजड वाहनेही खड्डय़ांमुळे नादुरूस्त होऊन बंद पडतात. यावर्षी जुलै महिन्यात मुंब्रा बाह्यवळण पुलावर एक भलामोठा खड्डा पडला होता. या भागाची दुरुस्ती करण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. वाहनचालकांना चार ते पाच तास दररोज वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासंदर्भाची परवानगी मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाकडे पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा त्रास चालकांना सहन करावा लागणार आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या काही महिन्यांत हाती घेतले जाणार आहे. वारंवार पडणाऱ्या खड्डय़ांवर हा कायमस्वरूपी उपाय आहे.

– अमोल वळवी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर २०१४ ते २०१९ या कालावधीत ७८ नागरिकांचा बळी गेलेला आहे. रस्ता तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते पाहणीसाठी उपस्थित नसतात. तज्ज्ञ पथकांच्या देखरेखीखाली दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

– आरीफ इराकी, रहिवासी, मुंब्रा.