लग्न हा प्रत्येकासाठी आयुष्यभराचा आनंदोत्सव असतो;परंतु आजकालच्या मुला-मुलींमध्ये लग्नासंदर्भात खूप असुरक्षितता आणि भीती आहे. ही भीती काढण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. आईवडिलांनी आपल्या वागण्यातून सहजीवन म्हणजे काय हे मुलांना दाखवले पाहिजे, तरच त्यांना या आनंदोत्सवाचे महत्त्व समजेल. त्यामुळेच अनुरूप विवाहसंस्थेचे कार्य जास्त महत्त्वाचे, गरजेचे आहे, असे मत कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.
अनुरूप विवाहसंस्था आणि ‘लोकसत्ता’ यांच्या वतीने ठाणे येथे झालेल्या ‘शोध अनुरूप जोडीदाराचा’ या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
कार्यक्रमाचे दोन तास मी शब्दश: ‘सावर रे’ जगत होतो, या शब्दांत दवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण खरंच वैचारिक स्तरावर प्रगल्भ, आधुनिक झालो, म्हणजे नक्की काय आणि कसे झालो, यासारख्या अनेक प्रश्नांवर मी विचार करायला लागलो, असे मत त्यांनी व्यक्त केले. ठाण्यातील गोखले मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास विवाहेच्छुक तरुण-तरुणी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी ‘अनुरूप’च्या गौरी कानिटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लग्नाची चिंता पालकांनी करावी का आणि किती? पत्रिकेला किती महत्त्व द्यावे? लग्नानंतरही मुलीने तिच्या आईवडिलांची आर्थिक जबाबदारी उचलावी का? व्यवसायातील मुलांचा आजकालच्या मुली विचार करत नाहीत, असे का, या महत्त्वाच्या प्रश्नांवर ऊहापोह झाला.
सप्तपदीआधी..
पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर काही मानसिक तपासण्या कराव्या का? पत्रिकेतील किती गुण जुळायला पाहिजेत? लग्नासाठी मुला-मुलीमध्ये किती अंतर असावे? समोरची व्यक्ती आपल्यासाठी अनुरूप आहे का हे कसं ओळखायचं? यांसारखे असंख्य प्रश्न उपस्थित असलेल्या पालकांनी आणि वधूवरांनी विचारले. कार्यक्रमात पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन कानिटकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मुला-मुलीसाठी त्यांच्या पालकांचा पाठिंबा असणे ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे मुलांच्या सुखासाठी, आनंदासाठी आजच्या पिढीचे विचार काय आहेत, नवनवीन ट्रेंड्स काय आहेत यांसारख्या गोष्टींमध्ये रस घेतला पाहिजे. लग्न जुळवण्यासाठी जसे आपण प्रयत्न करतो तसेच ते लग्न टिकवण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. ‘अनुरूप’चे तन्मय कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.