अशुद्ध पाणी, निकृष्ट बांधकाम, सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका

वसई : विरारमधील बोळिंज येथे ‘म्हाडा’तर्फे उभारण्यात आलेल्या वसाहतींमधील रहिवाशांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अशुद्ध पाणी, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, जलसाठा साठवणूक करण्यासाठी टाक्यांचा अभाव, ढिसाळ सुरक्षा व्यवस्था अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे म्हाडाच्या कारभाराविरोधात रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विरार पश्चिमेतील बोळिंज परिसरात म्हाडा वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमधील इमारती २४ मजल्यांच्या असून त्यामध्ये एकूण ९ हजार ५०० सदनिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये  २०१४, २०१६ व २०१८ या दरम्यान काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये आतापर्यंत १ हजार ५७५ सदनिकांना ताबा देण्यात आला आहे. ताबा देताना येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक होते. परंतु अजूनही या सुविधा दिल्या नसल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

आजही या इमारतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्याचाही पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही. अनेकदा मिळणारे पाणी दूषितच असल्याने त्याचा वापर रहिवासी करू शकत नाही.

पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिका व म्हाडा यांच्याकडे अनेकदा मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

पाणीपुरवठा करण्यासाठी म्हाडा वसाहतीमध्ये सार्वजनिक पाण्याची टाकीही उभारण्यात आली नसल्याने सदनिकांमध्ये पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. निम्म्याहून अधिक सदनिकांमध्ये गळती होत असल्याने म्हाडातर्फे करण्यात आलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे यातून उघड झाले आहे.

नागरिकांना वर खाली ये-जा करण्यासाठी लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत त्याही अधूनमधून बंद पडत असतात अनेक वेळा नागरिक त्यामध्ये अडकून पडत असतात तसेच अग्निशमन यंत्रणासुद्धा बंदच आहे तर एवढय़ा मोठय़ा नागरी वस्ती असलेल्या इमारतींच्या समोर सुरक्षारक्षकही म्हाडाने ठेवला नाही. त्यामुळे येथील नागरिकांची व आजूबाजूच्या परिसराची सुरक्षाही वाऱ्यावर आहे. जर या भागात एखादी मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिक विचारू लागले आहेत. या निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या समस्येवर म्हाडा प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी लक्ष देऊन आम्हाला योग्य त्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सदनिका खरेदीमध्येही फसवणूक

फेब्रुवारी २०१९ पासून या सदनिकांच्या किमती या रेडी रेकनर व बाजारभावापेक्षा अधिक असल्याने त्या कमी करण्यासाठी वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता त्या वेळी म्हाडाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन विरार येथील सदनिकांच्या किमती या २०४ रुपये प्रति चौरस फूट दराने कमी केल्या जातील असे आश्वासन देऊन त्याचा लाभ हा सोडत २०१८ यांच्या सह २०१४ व २०१६ मधील सदनिकाधारकांना रोख रकमेच्या स्वरूपात मिळतील असे सांगण्यात आले होते. परंतु यातही म्हाडाने चालढकल करीत ३ डिसेंबर २०१९ रोजी आलेल्या जीआरनुसार केवळ ४० ते ५० रुपये एवढीच मूळ किमतीत कपात केली त्यामुळे घरांच्या किमती कमी करू असे आश्वासन देणाऱ्या म्हाडाने नागरिकांची फसवणूक केली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

१) मागील एक-दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी म्हाडाकडे मागणी करतोय परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नीलेश कोळेकर, स्थानिक रहिवासी

२) म्हाडाने सदनिका धारकांकडून मेंटेनन्स म्हणून दरमहा २१०० ते ३००० प्रमाणे वर्षभराची रक्कम घेतली आहे परंतु कोणत्याही सोयी सुविधा योग्य प्रकारे पुरविली जात नाही तसेच तक्रार करूनही याची दखलसुद्धा घेतली जात नसल्याने आता आम्ही सर्व रहिवासी एकत्रित येऊन आंदोलनाच्या तयारीत आहोत.

देवेंद्र हरमकार, स्थानिक रहिवासी