सर्वसाधारण सभेत आंदोलन, बाचाबाची आणि गोंधळ

ठाणे : सभागृहाच्या सभा शास्त्राचे नियम वेशीवर टांगत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्यासह काही नगरसेवकांच्या असभ्यपणाचे दर्शन बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान घडले. मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी का मिळत नाही, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आयुक्त सभेला उपस्थित राहत नसल्याचा दावा करत पठाण यांनी सभेच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलन सुरू केले. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी साथ दिली. या सर्वाना व्यासपीठावरून बाजूला करताना शिवसेना नगरसेवक आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी १२.३० वाजता सुरू झाली. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. पाणी, विद्युत दिवे आणि शौचालये अशा मूलभूत कामांसाठी वारंवार निधीची मागणी करूनही तो मिळत नाही. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे आयुक्तांना सभेला बोलवावे आणि त्यानंतरच सभेचे कामकाज सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली.

मंत्रालयात महत्त्वाची बैठक असल्याने आयुक्त बैठकीला उपस्थित नसल्याचे स्पष्टीकरण महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. तरीही पठाण यांनी आयुक्तांना बोलविण्याचा आग्रह धरत सभेच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलन सुरू केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या नगरसेविका अशरीन राऊत यासुद्धा व्यासपीठावर गेल्या आणि आंदोलनाला साथ दिली. या सर्वाना व्यासपीठावरून बाजूला करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व्यासपीठावर गेले आणि त्याच वेळी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीही व्यासपीठावर जाऊन पठाण यांच्या आंदोलनाला साथ देण्यास सुरुवात केली. शिवसेना नगरसेवक योगेश जानकर आणि चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली.

राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनीही पठाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेर सेना नगरसेवकांनी पठाण आणि चव्हाण यांना उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, ते व्यासपीठावर झोपले. सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पालिका सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. अखेर महापौरांच्या आदेशानंतर सुरक्षारक्षकांनी पठाण यांना उचलून व्यासपीठाच्या खाली आणले. या सर्व प्रकारानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी मुंब्य्रातील पाणीटंचाईच्या समस्येवर चर्चा घडवून आणण्यास परवानगी दिली आणि यानंतर सभागृहात वातावरण पुन्हा निवळले.

आघाडीत बिघाडी नाही – पठाण

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जुंपली असतानाच भाजपचे नगरसेवक सभागृहात बसून मजा पाहात होते. तसेच भाजप नगरसेवकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचदरम्यान महापौरांशी नव्हे तर प्रशासनाशी आमचे भांडण असल्याचा दावा करत विरोधी पक्ष नेते पठाण यांनी महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नसल्याचे स्पष्ट केले. शहरातील मूलभूत कामांसाठी निधी मिळत नसल्याबाबत सभागृहात चर्चा सुरू असतानाच, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्यात बाचाबाची झाली आहे. अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांची समजूत काढत वादावर पडदा टाकला.