देशभर स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले असतानाच अवकाळी पावसामुळे या आजाराच्या रुग्णांत वाढ होऊ लागल्याचा परिणाम यंदाच्या धुळवडीवर दिसण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींसोबत आनंदाने साजरा केला जाणारा रंगांचा हा सण स्वाइन फ्लूसारख्या आजाराला निमंत्रण देण्यासारखा आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने नागरिकांनी यंदाची धुळवड गर्दीत साजरी करू नये, असे आवाहन केले आहे. पालिकेचा हा सल्ला मानायचा झाला तर धुळवडीचा आनंद घरच्या घरीच साजरा करण्याची वेळ नागरिकांवर ओढवू शकते.
स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढल्यापासून गेल्या महिनाभरात ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरांत या आजाराचे ६० रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. सुमारे पंधरवडय़ापूर्वी या आजारात एखाददुसरा रुग्ण आढळून आला असताना आठवडाभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. या ६० रुग्णांपैकी ११ रुग्ण महापालिका हद्दीबाहेरून येथे आल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षतेच्या दृष्टीने तातडीने उपाय हाती घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणात स्वाइन फ्लूचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता अधिक असते. याच काळात होळी आणि धुळवडीसारखे सण आल्याने महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून शक्यतो गर्दीत जाऊन धुळवड खेळणे टाळा, असे आवाहन केले आहे.
मासुंदा, उपवनच्या धुळवडीचा बेरंग
ठाणे परिसरात मासुंदा तलाव, कचराळी उद्यान, उपवन परिसरात धुळवड साजरी करण्यासाठी तरुणांचे जथेच्या जथे गोळा होत असताात. या ठिकाणी साजरी होणारी सर्वपक्षीय राजकीय धुळवडही अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असते. मात्र, महापालिकेने ‘स्वाइन फ्लू’चा इशारा दिल्याने यंदा या ठिकाणी धुळवडीचा उत्साह आटण्याची शक्यता आहे. त्यातच रासायनिक आणि हानिकारक रंगांच्या वापरावरही पालिका आणि ठाणे पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने धुळवड साजरी करणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कशाची ‘होळी’ केली?
होळी म्हणजे अमांगल्याचा त्याग करून मांगल्याचे स्वागत करण्याचा सण. त्यामुळेच होलिकात्सवाच्या निमित्ताने अपप्रवृत्ती, कुप्रथा, वाईट सवयी यांचे प्रतिकात्मक दहन करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. तर काही ठिकाणी होलिकात्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. तुमच्या अशाच अनोख्या होळीची छायाचित्रे आम्हाला पाठवा. ‘लोकसत्ता ठाणे’च्या शनिवारच्या अंकात निवडक छायाचित्रांना प्रसिद्धी दिली जाईल. सोबत या होळीची वैशिष्टय़े सांगणारी माहिती व ठिकाण नक्की कळवा.
रंगात रंगलो सारे.
अमांगल्याचा त्याग केल्यानंतर मांगल्याचे स्वागत करताना होणारी रंगांची उधळण आबालवृद्धांना मोहित करत असते. धुलीवंदनाच्या निमित्ताने सारेच जण रंगात न्हाऊन ‘बहुरंगी’ होत असतात. आपल्या या रंगबिरंगी अवताराचे क्षण प्रत्येकजण मोबाइलमध्ये टिपत असतो. हेच क्षण तुम्ही ‘लोकसत्ता ठाणे’सोबत शेअर करा. धुलीवंदनाच्या दिवशी रंगात न्हाऊन गेलेला तुमचा व तुमच्या मित्रमंडळींचा ‘सेल्फी’ आम्हाला शुक्रवारी दुपारी दोनपर्यंत पाठवा. निवडक छायाचित्रांना ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा ई मेल :  newsthane@gmail.com

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of catching swine flu virus high on holi
First published on: 05-03-2015 at 01:30 IST