ठाणे : पश्चिम रेल्वे स्थानक आणि कोपरी भागातील वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जाणारा खारटन परिसरातील रस्ता खचून त्याठिकाणी मोठे भगदाड पडल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. या घटनेनंतर स्थानिकांनी या मार्गवरील वाहतूक बंद केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने कामावरून घरी परतत असलेल्या नागरिकांचे हाल झाले.

ठाणे येथील खारटन परिसरातील रस्ता हा पश्चिम रेल्वे स्थानक आणि कोपरी भागातील वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मार्गावरून कळवा, साकेत, कशेळी, काल्हेर भागातील नागरिक दररोज कामानिमित्ताने बस आणि शेअर रिक्षाने प्रवास करतात. सोमवारी रात्री या मार्गावरील ठाणा कॉलेज जवळील शीतला माता चौक परिसरात रस्ता खचून त्याला मोठे भगदाड पडले. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तात्काळ मार्गरोधक लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम सुरू असतानाच हा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.