चेंबरचे झाकण तुटून आत गेले, महिला बचावली

ठाणे : लोकमान्यनगर भागातील रस्त्यावरील डांबराच्या थराखाली दडलेले मलनि:सारण वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटून आत गेल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या रस्त्यावरून एक भाजी विक्रेती जात असताना हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. या घटनेनंतर या मार्गावरील बस वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली.

लोकमान्यनगर भागातील डवलेनगर ते यशोधननगर मार्गावरून बसगाडय़ांचीही सतत वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील मलनि:सारण वाहिनीच्या चेंबरचे झाकण रस्त्यावरील डांबराच्या आत गाडले गेले होते. या भागातून प्रीती सिंग (२६) या बुधवारी पहाटे जात होत्या. त्याच वेळेस डांबराच्या थरासकट झाकण आतमध्ये गेले. त्याही पाच फू ट खोल खड्डय़ात पडल्या. त्यांनी खड्डय़ाच्या बाजूच्या भागाला दोन्ही हातांनी पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरड केली.

त्या वेळेस सकाळच्या वेळेस फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी आवाज ऐकून त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे ही महिला बचावली.

दुरुस्ती सुरू

या घटने संदर्भात नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधला असता, हे चेंबर १५ ते २० वर्षांपूर्वीचे असून पाणी साचून हा रस्ता खचला. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मलनि:सारण विभागाचे उपनगर अभियंता भारत भिवापूरकर यांनी या घटनेत जखमी झालेल्या महिलेची भेट घेऊन विचारपूस करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.