scorecardresearch

रस्ता ठेकेदाराच्या बेपर्वाईने शाळेत जाण्याचा रस्ता बंद; रस्ता नसल्याने शाळेला सुट्टी, पालक संतप्त

कल्याण शीळफाटा रस्त्यावरील डोंबिवली जवळील कोळे गावात सेंट थेरेसे कॉन्व्हेंट शाळा आहे.

school bus
रस्ता ठेकेदाराच्या बेपर्वाईने शाळेत जाण्याचा रस्ता बंद

डोंबिवली- कल्याण शीळफाटा रस्त्यावरील डोंबिवली जवळील कोळे गावात सेंट थेरेसे कॉन्व्हेंट शाळा आहे. डोंबिवली, कल्याण, पलावा, लोढा वसाहतींमधून विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी येतात. शाळेत येण्याच्या मुख्य पोहच रस्त्यावर शीळफाटा रस्ते कामाच्या ठेकेदाराने काँक्रीटीकरण कामासाठी खोदून ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शाळेच्या बसना येजा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने शाळेला बुधवार पासून सुट्टी द्यावी लागली आहे.

करोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या शीळफाटा रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामासाठी शाळेचा रस्ता बंद करण्यात येत असेल तर ते गंभीर आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रस्ते ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने या कामाच्या ठेकेदाराला आताच शाळा सुरू झाल्या आहेत. ही कामे शाळेला सुट्टी लागेल किंवा शाळेच्या बस जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होईल, तेव्हा करण्यात यावा, अशी विनंती केली होती. त्या मागणीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले. शीळफाटा रस्त्याने कोळे गावातून डावे वळण घेऊन सेंट थेरेसा शाळेकडे जाणाऱ्या पोहच रस्त्याच्या दर्शनी भागात ठेकेदाराने काँक्रीटीकरण कामासाठी खड्डा खोदून ठेवला आहे. हे काम वेगाने पूर्ण केले जात नाही. त्यामुळे शाळेत बस, रिक्षा, खासगी वाहनाने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

शाळा व्यवस्थापनाने या रस्त्याच्या बाजुला असलेल्या माळरानातून शाळेची बस वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पाऊस सुरू असल्याने माळरानातील कच्च्या रस्त्यावर चिखल झाला आहे. एकावेळी १२ बस दिवसभरात या कच्च्या रस्त्यावरून धावत असल्याने रस्त्यावर एक ते दोन फुटाचे खड्डे पडले आहेत. या चिखलात बसचे टायर रुतून बसतात. बस चिखलात अडकू लागल्याने विद्यार्थ्यांना त्या चिखलातून बाहेर काढणे. त्यांना मुख्य रस्त्यावरील बस मधून घरी सुखरुप पोहचविण्याची आव्हानात्मक जबाबदारी शाळेवर आली होती. चिखलातील रस्त्यातून विद्यार्थी वाहतूक न करण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे. रस्ता सुस्थितीत होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल, असे शाळेच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.

शाळेत येजा करण्याचा शीळफाटा रस्ते कामातील रस्ता लवकर पूर्ण करावा यासाठी आ. प्रमोद पाटील, या रस्ते कामाच्या अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. शाळा व्यवस्थापनाने शीळफाटा रस्ते कामाच्या ठेकेदाराला सांगुनही त्याने शाळेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना बसला आहे. या कामाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. शाळेत घटक चाचणी परीक्षा आता सुरू होणार आहेत. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत केवळ पोहच रस्ता नाही म्हणून शाळा बंद ठेवावी लागते हे गंभीर आहे, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road school closed negligence road contractor roads parents angry ysh