ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या सर्वच शहरांमध्ये सोनसाखळी चोरांनी गेल्या काही महिन्यांत अक्षरश: उच्छाद मांडला होता. भरदिवसा रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून मोटारसायकलींवरून पळ काढणाऱ्या सोनसाखळी चोरांमुळे नागरिकांत दहशत पसरली होती. दिवसागणिक सरासरी पाच सोनसाखळी चोरीच्या घटनांची ठाणे पट्टय़ातील पोलीस ठाण्यांत होत होती. मात्र, या चोरांना पकडण्याचे वा त्यांचे धागेदोरे हाती लागण्याचे प्रमाण जवळपास शून्य होते. सोनसाखळी चोरांच्या दहशतीने अनेक महिलांनी सोन्याचे दागिने वापरणेच सोडून दिले. पण पोलीस यंत्रणेला या गोष्टींनी जाग आलीच नाही. अशातच परमवीर सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि त्याच दिवशी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आखली गेली. पोलिसांनी मनात आणले तर भल्याभल्या गुंडांनाही धडकी भरू शकते, हे या मोहिमेने दाखवून दिले. अगदी थोडय़ाच दिवसात आंबिवलीजवळील इराणी वस्तीवर छापा घालून पोलिसांनी अट्टल सोनसाखळी चोरांना जेरबंद केलेच; पण त्याबरोबर मोठा मुद्देमालही हस्तगत केला. या छाप्याने सोनसाखळी चोरीच्या घटनांना आवर घातला आहे. शिवाय या छाप्यातूनच आंबिवलीजवळील इराणी वस्ती चोरांची छावणी कशी बनली आहे, याचेही प्रत्यंतर आले.
आंबिवलीजवळील ही इराणी वस्ती आजच बदनाम झालेली नाही. ठाणे, मुंबईत घडलेल्या अनेक गुन्ह्य़ांतील आरोपींचा माग काढत पोलीस या वस्तीच्या हद्दीवर येऊन ठेपले आहेत. पण या वस्तीतील नागरिकांनी पोलिसांविरोधात दाखवलेली आक्रमक एकजूट आणि त्यातून दंगलसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती यामुळे खूपच कमी प्रकरणांत पोलिसांची पावले वस्तीच्या आत पडली. अशा ‘आश्वस्त’ वातावरणामुळे ही वस्ती पुढे चोरांचे आश्रयस्थानच बनू लागली. या वस्तीला वेळच्या वेळी पोलिसांनी आक्रमकपणे धडका मारल्या असत्या तर चोरांच्या या भागात ज्या सध्या छावण्या तयार झाल्या आहेत, त्या होण्यात किमान अडथळे तरी आले असते. स्थानिक पोलिसांची निष्क्रियता या वस्तीला फोफावण्यास हातभार लावणारी ठरली. बिनभांडवली ऐवज मिळवल्याने आश्रय देणाऱ्याला काही वाटा, येथे राहतोय म्हणून खबर देऊ नये म्हणून शेजाऱ्याला थोडा वाटा, या वस्तीभोवती २४ तास गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना ताकास तूर लागू नये म्हणून त्यांची नजरबंदी करण्यात या वस्तीमधील काही मंडळी माहीर होती. त्यामुळे वर्षांनुवर्षे चोऱ्या होत होत्या. भुरटे या वस्तीत येऊन लपत होते. तपास करायला कुणी पोलीस पथक आले की येथील महिला आक्रमकपणे पुढच्या फळीवर येऊन दोन हात करायला सज्ज असायच्या. अनेकदा येथे आलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याचे प्रकार घडले. स्थानिक पोलिसांना हा नित्याचा अनुभव असल्याने त्यांना माहिती असूनही त्यांनी कधीच इराणी वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन वगैरे करण्याच्या हालचाली केल्या नाहीत. उलट या वस्तीवर कारवाई केली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात धन्यता मानली. पोलिसांमधील या त्रुटींचा यथेच्छ गैरफायदा इराणी वस्तीमधील काही लोकांनी उचलला. काही महिन्यांपासून सोनसाखळीच्या वारेमाप घटना घडत होत्या. या घटनांचे धागेदोरे इराणी वस्तीशी जोडले जात होते. वसई न्यायालयाने इराणी वस्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या दोन्ही गोष्टींनी पोलिसांना कारवाईचे बळ दिले. स्थानिक पोलिसांना पूर्ण अंधारात ठेवून कोड चिन्हाचा वापर करून इराणी वस्तीवरील कारवाईची दिशा ठाणे पोलिसांच्या वरिष्ठ पथकाकडून ठरवण्यात आली. तीनशे पोलिसांनी इराणी वस्तीसह पाटीलनगर, इंदिरानगरला घेरले. चोरीच्या १९ दुचाकी व १५ किलो सोने जप्त केले.
भगवान मंडलिक
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
तपासचक्र : वस्ती इराणी, चोरांची छावणी
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या सर्वच शहरांमध्ये सोनसाखळी चोरांनी गेल्या काही महिन्यांत अक्षरश: उच्छाद मांडला होता.
First published on: 01-04-2015 at 12:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbers camp in irani habitation