डोंबिवली शहरातील मध्यवर्ती ठिकाणे अलिकडे गुन्हेगारांच्या नजरेत भरली आहेत. टिळकनगरमधील गजबजलेल्या वस्तीत दोन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे.
डोंबिवली शहरातील मध्यवर्ती ठिकाणे म्हणजे रामनगर, टिळकनगर, विष्णूनगर. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा परिसर. त्यामुळे निवासासाठी या भागास रहिवाशांचे प्राधान्य असते. कल्याण-डोंबिवली ही शहरे चहूबाजूंनी वाढत असली तरी लोकांचा कल याच भागात राहण्याकडे असतो, परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा सगळा परिसर स्थानिकांना काहीसा असुरक्षित भासू लागला आहे. टिळकनगर या शहराच्या गजबजलेल्या वस्तीत दोन दिवसांपूर्वी एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. शिधावाटप अधिकारी असलेल्या या महिलेच्या घरात दिवसाढवळ्या शिरून चोरटय़ांनी मोठा ऐवज तसेच मोबाइल चोरून नेला. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या या महिलेची चोरटय़ांनी निर्घृणपणे हत्या केली. हे सगळे होत असताना शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही पत्ता लागला नाही. यावरून पाळत ठेवून चोरटय़ांनी हा गुन्हा केला आहे हे स्पष्ट होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणे ही आता गुन्हेगारांच्या नजरेत भरली आहेत, हे अशा घटनांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे चाकरमानी असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.
सोनसाखळ्या, घरफोडय़ा यांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. महापालिका हद्दीतील नऊ ते दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज विविध प्रकारचे ३० ते ३५ गुन्हे दाखल होत असतात. कल्याण शहरात तर सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. त्यासाठी खास पथक तयार करून अशा भुरटय़ांना जेरबंद करावे यासाठी अधूनमधून मोहिमा राबविण्यात येतात, मात्र प्रभावीपणे फारसे काही घडताना दिसत नाही. के.पी.रघुवंशी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार असताना त्यांनी कल्याणातील सोनसाखळी चोरांना जेरेबंद करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम काही प्रमाणात यशस्वी झाली. रघुवंशी यांच्या बदलीनंतर सर्व काही थंडावले. विद्यमान आयुक्त विजय कांबळे यांनी सोनसाखळी चोरांना जेरेबंद करण्याचे आदेश काढले आहेत. आयुक्तांचे आदेश निघेपर्यंत स्थानिक उपायुक्त दर्जाचे अधिकारी नेमके काय करीत असतात, हा मोठा प्रश्न आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची अवस्था सध्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसारखी झाली आहे. कल्याण पोलीस परिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाढत्या गुन्हेगारीकडे फारसे गांभीर्याने लक्ष आहे, असेही चित्र दिसत नाही. टिळकनगरसारख्या परिसरात दिवसाढवळ्या हत्या होणे हे येथील चाकरमान्यांसाठी धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे असे चित्र या शहरात नव्हते. नियोजनाच्या आघाडीवर फसलेल्या या शहराने सांस्कृतिकपणा नेहमी जपला आहे. दररोज लोकल पकडून मुंबईच्या दिशेने धावणारा येथील चाकरमान्यांच्या काळजाचा ठोका या हत्येमुळे चुकला आहे.
एक शांत शहर असा डोंबिवलीचा नावलौकिक राहिला आहे. त्यामुळे पूर्वीपासून मंत्रालय, मुंबई परिसरात कोठेही नोकरी करीत असलेले चाकरमानी डोंबिवलीत राहण्याला प्राधान्य देतो. मुंबईपासून दोन तास दूर असलो तरी शांत व सुरक्षित ठिकाणी राहतो याचे त्यांना समाधान असे. कल्याण शहराचा रामबाग, पारनाका, जोशीबाग, बाजारपेठ, संतोषी माता, मुरबाड रस्ता हा मध्यवर्ती निवासासाठी शांत असल्याने लोक या भागात राहण्याला प्राधान्य देतात. आता ही सगळी परिस्थिती नागरीकरणामुळे बदलत चालली आहे. त्यावर झटपट उपाय नसल्याने भर वस्तीत घुसून हत्या घडण्याचे प्रकार घडत आहेत. शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात दिवसाढवळ्या घरात घुसून चोरीसाठी हत्या करण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
या सर्व गुन्हेगारीचे मूळ कल्याण-डोंबिवली शहरांच्या परीघ क्षेत्रात जी बेसुमार बांधकामे भूमाफियांकडून उभी राहत आहेत, त्यामध्ये आहे. स्वस्तात मस्त घर बेकायदा चाळी, झोपडीमध्ये राहायला मिळते. रात्रीचा सुरक्षित निवारा उपलब्ध होतो. चोरी केल्यानंतर काही अवधीत आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोहोचता येते. अशी तयार व्यवस्था चोरटय़ांसाठी उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन लूटमार, चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी चोऱ्यामाऱ्या होत होत्या. पण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रमाणही तितकेच होते. दुर्दैवाने आता तसे चित्र नाही. भुरटे चोर ज्या बेकायदा वस्त्यांमध्ये राहतात. त्या वस्त्या कल्याण-डोंबिवली पालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त, प्रभाग क्षेत्र अधिकारी, उपअभियंता, बीट मुकादम, निरीक्षक, कामगार, सभापती आणि पोलिसांच्या आशीर्वादाने उभ्या राहत आहेत. टिटवाळ्यात तर पोलिसांनी बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी उघडय़ावर दुकाने मांडली आहेत. महापालिका
आयुक्त या विषयावर मौन बाळगून आहेत.
मुंब्रा येथे दोन वर्षांपूर्वी इमारत दुर्घटना घडून ७४ रहिवासी मरण पावले होते. त्या वेळी पहिली कारवाई स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर करण्यात आली होती. म्हणजे बेकायदा बांधकामांना कायद्याने पोलीसही तितकेच जबाबदार आहेत. कल्याण- डोंबिवली पालिकेच्या ६५ चौरस किलोमीटरच्या परीघ क्षेत्रात टिटवाळा, खडेगोळवली, काटेमानिवली, नेतिवली, २७ गाव परिसर, आयरे, कोपर पूर्व, रेतीबंदर, देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा, मोहने, आंबिवली, बल्याणी परिसरात बेसुमार बेकायदा चाळी भूमाफियांकडून बांधण्यात येत आहेत. ही बेकायदा बांधकामे महापालिका, पोलीस व्यवस्थेने पोसली आहेत. या बेकायदा वस्तीत कोण राहते आहे याचा पुरता अंदाज महापालिका, पोलिसांना आहे. त्याविषयी व्यवस्थेने आवाज उठवला तर सुरू असलेले दुकान कायमचे बंद होईल, अशी भीती आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांचा भस्मासुर आणि त्याला आशीर्वाद देणारी व्यवस्था हीच पडद्यामागून शहराच्या वेशीवर भुरटय़ांसाठी सुरक्षित ‘तळ’ उभारत आहेत. या तळातील भुरटे चोर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक शांत जीवनाला नखे लावण्याची कामे करीत आहेत.
भगवान मंडलिक
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
कल्याण-डोंबिवली शहरबात : शहराच्या वेशीवर चोरटय़ांचे ‘तळ’
डोंबिवली शहरातील मध्यवर्ती ठिकाणे अलिकडे गुन्हेगारांच्या नजरेत भरली आहेत. टिळकनगरमधील गजबजलेल्या वस्तीत दोन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे.

First published on: 25-02-2015 at 12:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery and theft at high risk in dombivli kalyan area