२० फुलांची जुडी ६०वरून १०० रुपयांवर; शनिवारी दर २०० रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज
प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’चे प्रत्येकालाच अप्रूप असते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला एखादी चांगली भेटवस्तू द्यावी, याची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होते. पण अचानक प्रेम व्यक्त करण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा गुलाबपुष्पासारखी भेट दुसरी कुठलीच नाही. त्यामुळेच हा दिवस जवळ येताच फुलांच्या राजाचा भाव अधिकाधिक वाढू लागतो. यंदाही तोच कल दिसू लागला असून गेल्या काही दिवसांत २० गुलाबपुष्पांची एक जुडी ६० रुपयांवरून १०० रुपयांवर पोहोचली आहे. तर शनिवापर्यंत हेच दर २०० रुपयांवर पोहोचतील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे, चिनी गुलाबांच्या किमतीतही जुडीमागे तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे.
गुलाबाच्या फुलाकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या काळात या फुलांची मागणी गगनाला भिडलेली असते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे ६० रुपयांना मिळणारी गुलाबाची जुडी सध्या १०० रुपयांवर पोहोचली आहे. हे दर ‘व्हॅलेंटाइन डे’ला २०० रुपयांवर पोहोचतील, असा दावा ठाण्यातील फुलबाजारातील विक्रेत्यांनी केला.
सध्या गुलाबांमध्ये टॉप सिक्रेट गुलाब, बोर्डी गुलाब, टाटा गुलाब अशा फुलांच्या जाती बाजारात उपलब्ध असतात. या फुलांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याने चार ते पाच रुपये किमतीच्या एका गुलाबाची किंमत व्हॅलेंटाईनच्या दिवशी तब्बल १५ ते २० रुपयांपर्यंत वाढणार आहे. बटर गुलाबाची बारा फुले असलेली जुडी सध्या ३० रुपयांना विकली जाते. मात्र १४ फेब्रुवारीला हे दर दुप्पट होण्याची शक्यता आहे. बंगळुरू, सातारा, सोलापूर, बारामती, जुन्नर, पुणे या ठिकाणाहून गुलाबाची फुले कल्याणच्या बाजारात येत असतात. दररोज फुलबाजारात दोन हजार जुडय़ांची आवक होत असते. मात्र, येत्या शनिवारी पाच हजार जुडय़ांची आवक होईल, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली.
‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल, पिवळा, सफेद, गुलाबी रंगात असणाऱ्या चायना गुलाबाच्या फुलांना ग्राहकांची जास्त पसंती असते. दरवर्षी दीडशे रुपयांपर्यंत मिळणार २० चिनी गुलाबांचा गुच्छ आता दोनशे रुपयांत मिळत आहे. सर्वसाधारणपणे चार रुपयाला एक अशा दरात मिळणारा चिनी गुलाब सध्या दहा रुपयांना विकला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झेंडूचाही भाव वधारला
माघी गणेशोत्सवासाठी कल्याणच्या बाजारात २५ टन झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. गणेशोत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. माघी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एरव्ही ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळणारी एक किलो झेंडूंची फुले दुप्पट दरात विकली गेली. पूजेसाठी लागणारी लहान झेंडूची फुले ८० रुपये प्रति किलो तर सजावटीसाठी लागणारी मोठी झेंडूची फुले १०० रुपये किलो या दरात विकली गेली, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी यशवंत पाटील यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rose prices soar ahead of valentines day
First published on: 12-02-2016 at 03:17 IST