कल्याण- कल्याण पूर्व नेवाळी नाका भागातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शीळ रस्त्यावरील पिसवली गावातील एका ४० वर्षाच्या इसमाने बुधवारी या भागातील एका लॉजमध्ये बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी रितेश सुभाष दुसाने (४०, रा. खोली क्र. २०६, एकविरा सावली सोसायटी, फिप्टी फिप्टी हॉटेलच्या मागे, पिसवली, कल्याण पूर्व) या इसमाला अटक केली आहे. पीडित मुलासमोर पोलिसांनी रितेशला उभा करताच, पीडित मुलाने हाच गैरप्रकार करणारा इसम असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये विहिरीत पडलेल्या मांजरीला माशाच्या तुकड्याच्या साहाय्याने काढले बाहेर

कोळसेवाडी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे हा प्रकार उघडकीला आला. पोलिसांनी सांगितले, नेवाळी परिसरात एका मजुरी करणारी महिला आपल्या १७ वर्षाच्या मुलासह राहते. मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. परीक्षेचा क्षीण घालवण्यासाठी पीडित मुलगा रविवारी मुंबईतील आपल्या काकाकडे राहण्यासाठी गेला होता. मुंबईत फिरून मौजमजा करू असा त्याचा विचार होता. बुधवार दिवसभर मरिन ड्राईव्ह समुद्र किनारा परिसर फिरून झाल्यावर पीडीत मुलगा सीएसएमटी येथून रात्रीच्या लोकलने कल्याण रेल्वे स्थानकात रात्री एक वाजता उतरला.

जवळ पैसे नसल्याने कल्याण रेल्वे स्थानक ते नेवाळी नाका प्रवास कसा करायचा असा प्रश्न पीडित मुलाला पडला. त्याने एका रिक्षा चालकाला विनंती करुन सांगितले की, माझ्या जवळ पैसे नाहीत, पण मला नेवाळी नाका येथे जायचे आहे. घरी गेल्यावर आईकडून पैसे घेऊन तुमचे १०० रुपये भाडे देतो. रिक्षा चालकाने पीडीत मुलाची विनंती मान्य करुन त्याला नेवाळी नाका येथे त्याच्या घरासमोर सोडले. मुलगा घराच्या दिशेने गेला. तेव्हा घराला कुलूप होते. त्याची आई नवी मुंबईतील उलवे येथे बहिणीकडे गेली असल्याचे त्याला समजले.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे; भुईसपाट करण्याची मोहीम तीव्र करणार, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती

रिक्षा चालकाला पैसे देणे गरजेचे असल्याने त्याने शेजाऱ्याकडे पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. मुलाने रिक्षा चालकाच्या मोबाईलवरुन संपर्क केला. आईकडून प्रतिसाद मिळाला नाही. रिक्षा चालक पैसे मिळत नसल्याने तेथेच थांबून होता. हा सगळा प्रकार पीडीत मुलाच्या घराजवळ स्कुटरवर बसलेला एक इसम पाहत होता. त्याने रिक्षा चालकाला आणि मुलाला काय झाले आहे असे विचारले. मुलाने रिक्षा चालकाला देण्यास पैसे नाहीत. आई घरी नाही असे स्कुटर चालकाला सांगितले. स्कुटर चालकाने पीडित मुलाला मदत करण्याच्या दृष्टीने जवळील १०० रुपये रिक्षा चालकाला दिले.

रिक्षा चालक निघून गेल्यावर पीडीत मुलगा घराला कुलूप असल्याने घर परिसरात घुटमळू लागला. स्कुटर चालकाने मुलाला येथे फिरण्यापेक्षा चल आपण बाहेर फिरून येऊ असे सांगून मुलाला कल्याण पूर्व भागातील विविध रस्त्यावर फिरवले. त्यानंतर रमेश दुसाने याने सकाळी नांदिवली येथील अनमोल गार्डन येथील साई लाॅजवर मुलाला आणले. आपण येथे मजा करू असे बोलून रमेशने एक द्रव्य थंड पेयात टाकून ते मुलाला पिण्यास दिले. पीडित मुलाला गुंगी आली. मुलगा गुंगीत गेल्यानंतर रमेशने मुलाच्या हतबलतेचा गैरफायदा घेत त्याच्यावर अनैसर्गिक, लैंगिक अत्याचार केले. मुलगा त्यास विरोध करत होता. परंतु, रमेशने जबरदस्तीने त्याच्याशी गैरप्रकार केले. मुलाने खोलीतून पळण्याचा प्रकार केला. त्याने दरवाजाच्या कड्या लावून घेतल्या. बाहेर कोठे हा प्रकार सांगितला तर मुलाला मारण्याची धमकी दिली. घडल्या प्रकाराने मुलगा घाबरला होता. थोड्याने वेळाने रमेशने मुलाला लाॅज बाहेर आणले. तेथे रस्त्यावर सोडून तो निघून गेला. पीडित मुलगा घडल्या प्रकाराने घाबरला होता.  पीडीत मुलाने चक्की नाका येथे ट्राफिक पोलीस कार्यालयात येऊन घडला प्रकार सांगितला. वाहतूक पोलिसांनी कोळसेवाडी पोलिसांना ही माहिती दिली. मुलाच्या आईला हा प्रकार समजताच ती कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना कोळसेवाडी पोलिसांनी हाॅटेल भागातील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून आरोपी रमेशला अटक केली. त्याला पोलीस ठाण्यात आणताच पीडित मुलाने त्याला ओळखले. पॉक्सो कायद्यांतर्गत रमेशवर मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.