लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : जिल्ह्यतील ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबीयांना पक्की घरे बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. या योजनेत मंजूर झालेल्या ६ हजार २९२ घरांपैकी ५ हजार ४२९ घरांचे काम गेल्या चार वर्षांमध्ये पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित घरांची कामेही लवकरच पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडून देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम अशा विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०१६ पासून ठाणे जिल्ह्यच्या ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केले जाते. त्यासाठी लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये घर बांधण्यासाठी चार टप्प्यांत दिले जातात. या योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांमध्ये शौचालयाची उभारणी अनिवार्य असते. या योजनेत ७ हजार ३८५ घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यापैकी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यांत एकूण ६ हजार २९२ घरकूल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार ४२९ घरांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यतील कच्ची घरे असलेल्या कुटुंबीयांना हक्काची घरे मिळाली आहेत. तर उर्वरित घरांची कामेही प्रगतीपथावर आहेत.