|| वैष्णवी राऊत
वसई पट्टय़ातील मिठाला भाव नाही; दूषित पाण्यामुळे व्यवसायावर परिणाम
नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत उत्पादित केलेल्या मिठाचे पावसापासून रक्षण करण्यासाठी मिठाचे ढिगारे बनवून ते सुरक्षित करण्याच्या प्रक्रियेस वसईत वेग आला आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू असली तरी पावसाळ्यानंतर मिठागरे खुली केल्यास मिठाला योग्य भाव मिळेल का या चिंतेत सध्या मीठ कामगार आहे. समुद्राच्या उधाणाचे पाणी कमी येत असल्याने आणि दूषित पाण्यामुळे ४० टक्केच मीठ उत्पादन होत असल्याने वसई पट्टय़ातील मीठ व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
पावसाळा जवळ आला आल्याने मीठ कामगारांनी पिकवलेल्या मिठाचे पावसापासून संरक्षण करण्याची तयारी सुरू केली असून त्यावर सुरक्षा कवच लावण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यांमध्येच मिठाचे उत्पादन घेतले जाते. हे उत्पादित केलेल्या मिठाचे ढिगारे बनवून ते गवताच्या पेंढय़ाने झाकून त्यास पावसापासून सुरक्षित केले जाते. या प्रक्रियेस सध्या वसईमध्ये सुरुवात झाली असून मीठ कामगार या प्रक्रियेमध्ये व्यग्र झाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्टय़ात १५ हजार एकर जागेवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा राज्य सरकारची, तर निम्मी जागा ही केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. पाच हजार कुटुंबे या व्यवसायावर आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधल्या १७०० एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते, परंतु गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात चालणाऱ्या या उद्योगाला उतरती कळा लागली आहे. गेल्या काही वर्षांत मिठागर व्यावसायिकांना अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इमारतीचे सांडपाणी, नाल्यातील सांडपाणी, रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे मीठ आगारातील पाण्यावर परिणाम होऊन अपेक्षित मीठ घटू लागले असल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे मदन किणी यांनी सांगितले.
वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो, परंतु त्यांना एक रुपये दहा पैशांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ ते १८ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो, परंतु व्यापाऱ्यांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. पाऊस गेल्यानंतर साधारण चार महिन्यांनंतर हे मीठ खुले करण्यात येते. त्यानंतर या मिठाची विक्री करण्यात येते, परंतु सध्या वसईतील मिठाला कमी भाव असल्याने यंदा तरी योग्य तो भाव मिळेल अशा प्रतीक्षेत सध्या वसईतील मीठ कामगार आहेत. मिठाचा भाव असाच राहिला तर आमच्या पुढची पिढी या मीठ व्यवसायाकडे वळू देणार नाही, अशी नायगाव येथील मीठ कामगार शंकर यांनी नाराजीने सांगितले. आताच आम्हाला कमी भाव मिळत असल्याने आमच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये, त्यामुळे शेतीकामे किंवा मासेमारीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करू, असे ते पुढे म्हणाले.