खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात दिलेली तक्रार गैरसमजातून दाखल केल्याचे सांगत महापालिकेतील अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांनी याप्रकरणी घूमजाव केले आहे. या संदर्भात पांडे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आणि आपणास कोणतीही धमकी आली नव्हती असे स्पष्टीकरण दिले.
निवडणुका झाल्यानंतर पोलीस तक्रार दाखल करणाऱ्या पांडे यांनी तब्बल पाच महिन्यांनंतर केलेल्या या घूमजावचे येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजिवडा मतदारसंघातून भाजपतर्फे संजय पांडे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. या मतदारसंघात सुरुवातीला सरनाईक यांचा विजय सोपा मानला जात होता. मात्र, महापालिकेत अपक्ष नगरसेवक असलेल्या पांडे यांनी सरनाईक यांना घाम फोडला. मतमोजणीच्या १५व्या फेरीअखेर पांडे आघाडीवर होते. या निवडणुकीचा निकाल येताच अवघ्या तीन दिवसांतच पांडे यांनी सरनाईक यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.