नाव आमचे सुधा
आम्हाला सर्व पक्षांमध्ये मुभा
सत्ता कुणाचीही असो,
पालिकेत आमचीच प्रभा..!
नाव एकनाथ असले तरी
भारूडाचा अभाव आहे
पूर्वी मालक होतो,
आता पालक म्हणून प्रभाव आहे..
बेरजेच्या राजकारणाचे डाव
नेहमीच खरे होत नाहीत,
अन् नाव वसंत असले तरी
ग्रीष्माची काहिली कमी होत नाही..
प्रतिभेच्या पलीकडचे ‘क्रिएशन’ शोधणे
हाच आमचा ध्यास..
आधुनिक युगातील आम्ही
वाल्मिकी आणि व्यास..!
नाव संजय, त्यात शहराचे मौर्यपद
तरीही आम्हाला दिव्यदृष्टी सोडा
साधी दृष्टीही नाही..
गटातटांच्या राजकारणात
डोळ्यावरची पट्टी हटत नाही..!

दिल्लीतल्या गादीवर बसली केरसुणी
इथल्या ‘आप’च्या सानेवर मात्र
फक्त प्रसिद्धीपत्रकांचीच भेंडोळी..!
आम्ही नाईक केवळ सत्तेचे पाईक
राज्य कुणाचेही असले तरी
आमच्या हाती असतो माईक..!
बदलला ऋतू आणि संपला बहर
घडाळ्यात उरला आता फक्त
संघर्षांचा गजर..!
नाव राजे तरीही,
आम्ही कामगारांचे तारणहार
सत्तेच्या सारीपाटात मात्र
आमचीच नेहमीच असते हार..!
– महादेव श्रीस्थानकर