वातानुकूलित यंत्रणेत सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृह १ जुलैपासून १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वातानुकूलित यंत्रणा पुरेशा प्रभावाने सुरू नसल्याने नाटय़प्रयोग सुरू असताना रसिकांच्या रोषाला व्यवस्थापनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे नाटय़गृह बंद ठेवून वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
ठाण्यातील घाणेकर नाटय़गृहाची दुरुस्ती लांबल्याने आणखी दीड महिने ते सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. घाणेकर पाठोपाठ सावित्रीबाई नाटय़गृहही बंद ठेवले जाणार असल्याने या दोन्ही नाटय़गृहांमधील प्रयोगांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. उन्हाळ्यात या नाटय़गृहातील वातानुकूलित यंत्रणा पुरेशा प्रभावाने सुरू नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. मध्यंतरी एका नाटय़ प्रयोगादरम्यान रसिक यामुळे आक्रमक झाल्याचे चित्र होते. या पाश्र्वभूमीवर नाटय़गृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १ ते १५ जुलैपर्यंत वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती करून नाटय़गृह पुन्हा सुरू करण्यात येईल.