ठाणे, कल्याणसह सर्व शहरांचा पाणीपुरवठा सुरळीत; मात्र दोन दिवस कमी दाबाने पुरवठा

उल्हास नदीपात्रातील पाण्यावर आलेला हिरव्या रंगाचा तवंग सोमवारी सायंकाळी बारवी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यासोबत वाहून गेल्यानंतर रात्री उशिरा स्टेम प्राधिकरण तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने नदीतील पाण्याचा उपसा पुन्हा सुरू केला. त्यामुळे मंगळवारी ठाण्यासह भिवंडी, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होणारा पाणीपुरवठा सुरळीत झाला. परंतु, सोमवारी पाणी बंद ठेवण्यात आल्यामुळे जलवितरण कोलमडल्याने मंगळवारी अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. या गोंधळाचा सर्वाधिक फटका झोपडपट्टी क्षेत्रातील नागरिकांना बसला.

ठाणे जिल्ह्य़ातील बारवी तसेच आंध्र धरणातून उल्हास नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येते. कल्याण येथील मोहने भागात उल्हास नदीच्या पात्रातून स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी विभाग पाणी उचलून ठाणे, मीरा-भाईंदर तसेच भिवंडी शहरांना पाणी पुरवठा करतात. याशिवाय कल्याण-डोंबिवली महापालिका याच पात्रातून पाणी उचलून शहरात पाण्याचे वितरण करते. रविवार सायंकाळपासून उल्हास नदीच्या पात्रात हिरव्या रंगाचा प्रदूषित तवंग दिसू लागल्याने स्टेम प्राधिकरण तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने पात्रातून पाणी उपसा थांबवला होता. तसेच स्टेम प्राधिकरणाने ठाणे, मीरा-भाईंदर तसेच भिवंडी शहरांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

हा तवंग हटवण्यासाठी सोमवारी सायंकाळी बारवी धरणातून पाणी सोडण्यात आले. या पाण्याच्या प्रवाहासोबत नदीपात्रातील हिरवा तवंग वाहून गेल्यानंतर रात्री उशिरा स्टेम प्राधिकरण आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीउपसा सुरू केला, अशी माहिती ठाणे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दिली. ‘नदीपात्रातून पाण्याचा उपसा सुरू झाल्याने शहरांचा पाणीपुरवठाही सुरळीत झाला आहे,’ असे स्टेम प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल विवेकानंद चौधरी यांनी सांगितले.

पाण्याचे गणित मात्र बिघडले

गेल्या आठवडय़ात दोनदा विद्युत बिघाडामुळे स्टेमचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता आणि त्यापाठोपाठ उल्हास नदीतील प्रदूषित पाण्यामुळे सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद होता. या बंदमुळे    वितरणाचे गणित बिघडले असून काही भागांत पाणीटंचाईची समस्येची शक्यता आहे, असे पालिकेचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे म्हणाले. २४ तासांच्या फरकाने शहरात पाणी वितरण होते. एक दिवसांच्या बंदमुळे ते ४८ तासांच्या फरकाने होईल. पुढील दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होईल. सोमवारी दिवसभर  शहर, घोडबंदर, वागळे, वर्तकनगर भागांत पुरवठा बंद होता.  झोपडपट्टी भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. समतानगर भागात जलकुंभचे काम सुरू असल्यामुळे या भागात आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.