अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदीर म्हणजे या शहराचे वैभव! युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेले हे मंदिर पुरातत्त्व अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वास्तू. मात्र या मंदिराच्या सुरक्षा व संवर्धनाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झालेले आहे. मात्र सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने या वास्तुवैभवाचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. मंदिर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून विविध कामे हाती घेतली आहेत.
अगदी काही वर्षांपूर्वी अंबरनाथ म्हटले की चार गोष्टी प्रामुख्याने आठवायच्या. एक केंद्र शासनाचा आयुध निर्माणी उद्योग (ऑर्डनन्स फॅक्टरी), डीएमसी म्हणजे धरमसी मोरारजींचा खत कारखाना, विम्को ही काडेपेटय़ा बनविणारी कंपनी आणि प्राचीन शिवमंदिर. त्यातील डीएमसी आणि विम्को काळाच्या ओघात लुप्त झाले. केंद्र शासनाच्या नव्या धोरणानुसार आता आयुध निर्माणी कारखानाही किती काळ टिकेल, हा प्रश्नच आहे. या पाश्र्वभूमीवर शिवमंदिर मात्र गेली साडेनऊशेहून अधिक वर्षे तत्कालीन मानवी संस्कृतीची ठळक खूण म्हणून उभे आहे. सध्या औद्योगिक व नागरी वसाहतीतील सांडपाण्यामुळे नाल्याची अवकळा आलेल्या वालधुनी नदीकाठची ही वास्तू निश्चित काल माहिती असणारे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन स्थापत्य वैभव आहे. मंदिरात सापडलेल्या शिलालेखातील नोंदीनुसार श्रावण शुद्ध नवमी इ.स. १०६० मध्ये हे मंदिर बांधण्यात आले. त्यानुसार हे मंदिर आता तब्बल ९५४ वर्षांचे आहे. थोडक्यात ही वास्तू फक्त अंबरनाथचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहे.
तत्कालीन अनेक वास्तू नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा परकीय आक्रमणांमुळे जमीनदोस्त झाल्या. अंबरनाथ येथील मंदिर मात्र त्याला अपवाद ठरले. त्यामुळे पुरातत्त्व अभ्यासकांच्या दृष्टीने हे मंदिर अत्यंत महत्त्वाचे आहे. युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या कलात्मक आणि महत्त्वाच्या वास्तूंमध्ये या मंदिराचा समावेश आहे. असे असले तरीही आधीच्या नऊशे वर्षांत या मंदिराची जितकी हानी झाली नसेल, तितकी झीज पुढील पन्नास वर्षांत झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी मंदिर परिसरात अनेक भग्न शिल्पशिळा होत्या. त्या एकेक करून गायब झाल्या. आता तर एकही शिल्पशिळा दिसत नाही. गेल्या तीन दशकांत या मंदिराचे संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणाच्या अनेक योजना जाहीर झाल्या. युती शासनाच्या काळात पर्यटन स्थळ म्हणून मंदिर परिसर सुशोभित करण्याचे जाहीर करण्यात आले. तीर्थक्षेत्र विकास योजनेतूनही काही कामे करण्याचे ठरले. मात्र प्रत्यक्षात मंदिर परिसर अगदी प्राथमिक सोयी-सुविधांपासूनही अद्याप वंचितच राहिला आहे. चारही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणांमुळे मंदिर परिसर सुभोभीकरणाला मर्यादा आहेत. त्यात वालधुनीच्या प्रदूषित प्रवाहामुळे मंदिराच्या पायाला धोका निर्माण झाला आहे.
आता भाजपसोबत राज्यात पुन्हा सत्तेत असलेल्या शिवसेनेने अंबरनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला आहे. दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच तसे आदेश दिल्याने मंत्रालयापासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. शिवसेनेच्या बहुचर्चित व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या मंदिराचा समावेश आहे. त्याचा परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून पालिकेच्या वतीने मंदिर परिसरात विविध कामे सुरू आहेत. या विकास कामांकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष वेधले जावे म्हणून उद्यापासून तीन दिवसांचा (१३ ते १५ फेब्रुवारी) भव्य शिवमंदिर कला महोत्सव मंदिर परिसरात साजरा होतोय. त्यानंतर दोनच दिवसांनी- मंगळवारी १७ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. मंदिर परिसरात या दिवशी मोठी जत्रा भरते. लाखो भाविक या दिवशी अंबरनाथला येतात. दरवर्षी यानिमित्ताने मंदिर परिसरात किरकोळ डागडुजीची कामे होतातच, तेव्हा सध्या सुरू असलेली कामेही तशीच तकलादू आणि तात्कालिक तर नाही ना अशी शंका सर्वसामान्य अंबरनाथकरांच्या मनात आहे.
अवघ्या दोन महिन्यांवर पालिकेच्या निवडणुका आहेत. मात्र निवडणुकांचा आणि मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांचा काहीएक संबंध नसल्याचा दावा नगराध्यक्ष सुनील चौधरी करीत आहेत. कोंबडा कुणाचा का आरवेना, पहाट होणे महत्त्वाचे आहे. मंदिर परिसरात जर खरोखरच काही सुधारणा होत असतील, तर त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र हे करताना संबंधित लोकप्रतिनिधींनी आपला नेहमीचा संकुचित कंत्राटी दृष्टिकोन बाजूला ठेवायला हवा. तरच या मंदिराची सहस्रकाकडे होत असलेली वाटचाल निर्वेध होईल. कारण सार्वजनिक बांधकाम खात्याने मंदिर सुभोभीकरणाच्या नावाखाली केलेल्या कामांमुळे सद्य परिस्थितीत कोणताही फरक पडलेला दिसत नाही.
असा होईल विकास
पुरातत्त्व खात्याच्या आडमुठेपणामुळे बरीच वर्षे मंदिर परिसराचा विकास रखडला होता. मात्र आता काही अटींवर मंदिराच्या मूळ इमारतीला धक्का न लावता आजूबाजूच्या परिसरात कामे करण्याची परवानगी पुरातत्त्व खात्याने दिली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने वालधुनी नाल्याचा गाळ जेसीबी लावून काढला. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही वालधुनी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी आतिक्रमणे झाली असली तरी धर्मशाळेच्या परिसरातील सहा एकर जागा अद्याप मोकळी आहे. तिथे उद्यान विकसित केले जात आहे. त्यात जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मुलांसाठी मिनी ट्रेन आदी सुविधा असतील. मंदिर परिसरातील पेशवेकालीन कुंड स्वच्छ करून त्यात नौका विहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनंतर स्वामी समर्थ चौक ते शिवमंदिर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होऊन ते मार्च महिन्यापर्यंत संपेल. शिवमंदिर परिसर विकासासाठी पालिका प्रशासन तब्बल सव्वा तीन कोटी रुपये खर्च करीत आहे.
एवढे तरी कराच!
गेली २० वर्षे मुंबईतील डॉ. कुमुद कानिटकर मंदिराला नियमितपणे भेट देत आहेत. त्या मूळच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका. मात्र मंदिराची स्थापत्यशैली, त्यावरील अप्रतिम शिल्पे आणि त्याद्वारे मांडण्यात आलेल्या भारतीय पुराणकथा यांच्या त्या प्रेमातच पडल्या. या मंदिराचा सखोल अभ्यास करून त्यांनी आधी ‘अंबरनाथ शिवालय’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. या ग्रंथास आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर हा ग्रंथ मराठीतूनही प्रसिद्ध झाला. या पुस्तकामुळे परदेशात मंदिराची ख्याती पोचली. परिणामी पुरातत्त्व विषयात रुची असणारे परदेशी पर्यटक त्यांच्या मुंबईभेटी दरम्यान आवर्जून मंदिर पाहायला अंबरनाथला येऊ लागले. पुरातत्त्व, स्थापत्य, शिल्पकला तसेच भारतीय अध्यात्म परंपरेचा अभ्यास करणारे अनेकजण मंदिर परिसराला भेट देत असतात. मात्र अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे सध्या येथे साधे प्रसाधनगृहसुद्धा नाही. त्यामुळे तातडीने तेवढी सोय करा, अशी विनंती या अभ्यासकांच्या वतीने डॉ.कुमुद कानिटकर यांनी केली आहे. या शिलाहारकालीन मंदिराचे वैशिष्टय़ विशद करणारा माहितीपट मंदिर परिसरात दाखविण्याची सोय हवी. त्यामुळे आलेल्या पर्यटकांना मंदिराची माहिती आणि महती नीटपणे कळू शकेल, असेही त्यांनी सुचविले आहे. या कामात मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.
प्रशांत मोरे