ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरू केलेल्या योजनेत केवळ १५ टक्के अर्ज

विभक्त कुटुंब पद्धत, घरातील सर्व जण नोकरी, शिक्षणानिमित्त दिवसभर घराबाहेर असणे अशा कारणांमुळे घरात एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ‘कर्तव्य’ या विशेष योजनेद्वारे पोलिसांनी देऊ केलेल्या मदतीकडे ठाणेकर वयोवृद्धांनी पाठ फिरवली आहे. जेमतेम १५ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. ‘पोलीस आम्हाला कसले संरक्षण देणार, ते स्वत:च मार खात आहेत,’ अशी प्रतिक्रिया पोलीस मित्रांच्या कानी पडत आहे.

ऑगस्टमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत या योजनेला प्रारंभ झाला होता. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस मित्र गेले दोन-अडीच महिने शहरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. त्यासाठी एक नमुना अर्ज तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सोसायटीत जाऊन पोलीस मित्र तिथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेची माहिती देतात. मात्र ‘कर्तव्य’ योजनेत सहभागी होण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता आहे. अनेकदा घरी हेलपाटे मारूनही ज्येष्ठ नागरिक अर्ज भरण्यास नकार देत आहेत. त्यामुळे विसंवाद, अविश्वास आणि अवास्तव अपेक्षांच्या गुंत्यात अडकलेल्या या पिढीशी संवाद तरी कसा साधायचा असा प्रश्न पोलीस मित्रांना पडला आहे.

उपलब्ध माहितीनुसार जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा, पाचपाखाडी, हिंदू कॉलनी, ब्राह्मण सोसायटी परिसरात सुमारे पाच ते सात हजार ज्येष्ठ नागरिक घरात बराच काळ एकटे अथवा दुकटे राहतात. या ज्येष्ठांची अपत्ये परदेशात, अन्य शहरांत अथवा ठाण्यातल्याच घोडबंदर विभागात स्वतंत्र बिऱ्हाड करून राहत आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर दिवसाढवळ्या होणारे हल्ले, त्यांची फसवणूक रोखावी, आजारपणात त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी हा पोलिसांच्या ‘कर्तव्य’ योजनेचा उद्देश आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांत पोलीस मित्रांनी या हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ‘कर्तव्य’ची संपूर्ण माहिती तसेच अर्ज दिला. मात्र पाठपुरावा करूनही  ८४० जणांनी ‘कर्तव्य’चे अर्ज भरले आहेत. या योजनेचा आम्हाला काय फायदा? पोलीस आम्हाला कसली मदत करणार? आम्हाला आठ आणे जादा व्याजदर हवा आहे, तो देणार का? असे संदर्भहीन प्रश्न विचारून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस मित्रांना हैराण केले आहे. एकाने तर अर्ज फाडून फेकून दिला.

सामाजिक भान बाळगून उत्स्फूर्तपणे या योजनेसाठी सर्वेक्षण करणाऱ्या पोलीस मित्रांची घोर निराशा झाली आहे. ‘ज्याचे करावे भले, तो म्हणे आपलेच खरे’ असा अनुभव असलेल्या या मंडळींना पडला आहे. विशेष म्हणजे या भागातील काही सोसायटय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिक कुटुंब बहुसंख्य आहेत. गोखले रोडवरील रौनक टॉवर अथवा मल्हार सिनेमागृहामागच्या ओम यशोदीप या इमारतींमध्ये तर सर्वच ज्येष्ठ नागरिक आहेत.

काळाच्या ओघात शेजारधर्म लयाला

‘कर्तव्य’ योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना पोलीस मित्रांनी समाजातील वाढत्या विसंवादाचा विदारक अनुभव घेतला. ‘नियरेस्ट वन इज डियरेस्ट वन’ या न्यायाने मदतीसाठी त्वरित धावून येणाऱ्या शेजाऱ्यांशी आता पूर्वीइतके सौहार्दाचे संबंध राहिलेले नाहीत. अतिशय किरकोळ आणि क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांसोबत भांडणे होतात. जुन्या ठाण्यातील या वस्त्यांमध्ये बहुतेक इमारतींना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे सोसायटीच्या आवारातील अपुऱ्या जागेत वाहने ठेवण्यावरून वाद आहेत. दारासमोर चपला काढणे, सामायिक जागेत कचरा टाकणे, पाळीव कुत्रा या कारणांवरूनही शेजाऱ्यांशी बेबनाव आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना मदत आणि सुरक्षा देण्यासाठी ‘कर्तव्य’ योजना असून त्यासाठी त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नमुना अर्जात ज्यांना उत्पन्नाचा तपशील नोंदवायचा नसेल, त्यांनी तो रकाना मोकळा सोडावा. मात्र संपर्क तसेच इतर माहिती द्यावी. काही अडचणी अथवा शंका असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.

डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, मुख्यालय, ठाणे  

मी स्वत: ३०० अर्ज वाटले. फक्त ११ कुटुंबांतील २२ जणांनी अर्ज भरले. काही ठिकाणी, पोलीस आम्हाला कसले संरक्षण देणार, ते स्वत:च मार खात आहेत, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.

महेंद्र मोने, पोलीस मित्र