डोंबिवली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना कल्याण मधील शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक बाळ हरदास यांनी नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. बाळ हरदास यांनी मात्र आपल्या वयाकडे पाहून आपण ही कृती करू शकतो का, असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावातून आपल्याला अडचणीत आणण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे स्पष्ट केले.

आपण मागील अनेक वर्षापासून कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेत आहोत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आपण ठाकरे गटात राहिलो. आता निवडणूक काळात ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यांना आपण ज्येष्ठ असल्याने त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला फोन करतो. तसा फोन आपण अरविंद पोटे यांना केला म्हणून ती धमकी होत नाही, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आपला सल्ला घेण्यासाठी येत आहेत, असेही हरदास यांनी सांगितले.

हेही वाचा…मध्यप्रदेशातून अपहरण केलेल्या सहा महिन्याच्या बाळाची पनवेलमधून सुटका

घटनाक्रम

कल्याण मधील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक, तक्रारदार अरविंद शंकर पोटे (६९) यांनी ही तक्रार बाळ हरदास यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अरविंद आणि विजया पोटे हे दाम्पत्य अनेक वर्ष शिवसेनेत आहेत. हरदास समर्थक म्हणून यापूर्वी ओळखले जात होते. गेल्या काही दिवसापूर्वी पोटे दाम्त्याने ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अरविंद, विजया पोटे हे कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक, नगरसेविका होते. विजया शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. पोटे कुटुंब कल्याण पश्चिमेत बेतुरकरपाडा येथे राहते. हरदास हे कल्याण मधील पारनाका भागात राहतात.

घडलेली घटना

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अरविंद पोटे हे सोमवारी पत्नी विजया हिच्या सोबत काही कामानिमित्त डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका भागात आले होते. त्यावेळी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान अरविंद पोटे यांना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सप कॉलवर आरोपी बाळ हरदास यांनी संपर्क केला. तुम्ही दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्यायचा. कल्याण सोडून निघून जायचे, अन्यथा संपून टाकीन, असे बोलून जीवे ठार मारण्याची धमकी अरविंद यांना दिली आहे. पोटे यांनी बाळ उर्फ हरिश्चंद्र हरदास यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा…ठाकुर्ली चोळेत जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती; पादचारी, वाहन चालक त्रस्त

अनेक शिवसैनिक ठाकरे गटातून शिंदे गटात दबावाच्या राजकारणामुळे जात आहेत. आपण त्यांना जाण्याचे कारण विचारत आहोत. अनेक वर्ष ही मंडळी आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत होती. त्यामुळे त्यांची आस्थेने मी चौकशी करतो. तसा फोन आपण पोटे यांना केला होता. आपण वैशाली दरेकर यांचा प्रचार करतो म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे आपल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणचे रहिवासी डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करतात यात सर्व काही आले. – बाळ हरदास, शिवसैनिक (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण.