एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी निर्णय; जांभळी नाक्याची मंडई आता सेंट्रल मैदानात

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान सुरू असलेल्या भाजीमंडयांमध्ये होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे कठीण बनल्याने आता या मंडयांचे विलगीकरण करून तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि पोलीस यांनी घेतला आहे. त्यानुसार बुधवारी, एक एप्रिलपासून जांभळी नाका येथील भाजीमंडई सेंट्रल मैदानात हलवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे महापालिका क्षेत्रातील अन्य भाजी मंडयाही रस्त्यांच्या कडेला किंवा मोठय़ा मैदानात हलवण्यात येणार आहेतर्.

संचारबंदीच्या काळात भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहतील, असे सांगण्यात आले असतानाही भाजीपाल्याची दुकाने व मंडयांमध्ये दररोज ग्राहकांची गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याचे तत्व पाळले जात नसल्याने करोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील सर्वात मोठय़ा जांभळीनाका मंडईत हेच चित्र पाहायला मिळते. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मंडईतून शहरातील अनेक किरकोळ विक्रेते माल खरेदी करतात. याशिवाय घाऊक व स्वस्त दरात भाजीपाला मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचीही येथे मोठी गर्दी असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणची गर्दी टाळण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही येथे गर्दी कायम आहे. अशी परिस्थिती ठाणे शहरातील अन्य मंडयांमध्येहीही दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता भाजीमंडयांचे विलगीकरण करण्याचा किंवा त्या विस्तृत ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जांभळी नाका येथील भाजीमंडई बुधवारपासून सेंट्रल मैदानात हलवण्याचा निर्णय पोलीस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या मैदानामुळे मोकळ्या जागेत भाजी विक्री होऊन नागरिकांची होणारी गर्दी टळणार असल्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले. तसेच भाजी विक्रीला सकाळची वेळही ठरवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शहरातील नौपाडा, वर्तकनगर, कोपरी, लोकमान्य-सावरकर नगर, वागळे इस्टेट, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील भाजी मंडई सुद्धा रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेत हलविण्यात येणार असून यामुळे नागरिकांची होणारी गर्दी टळणार आहे, असे महापालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.

बदलापुरातही मंडईचे विकेंद्रीकरण

बदलापूर शहरात पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात दोन ठिकाणी भाजीमंडया आहेत. जुन्या भाजी मंडईत दुकाने दाटीवाटीने उभारण्यात आली आहेत. तर सहकार हॉटेलजवळील भाजीमंडईत नागरिक मोठय़ा प्रमाणात भाजीखरेदीसाठी येत असतात. या दोन्ही ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ही भाजीमंडई बंद करून शहरातील विविध भागातील महत्वाच्या चौकांमंध्ये आता भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे. पश्चिमेतील शाश्वत पार्क चौक, दत्त चौक, स्वामी समर्थ चौक, तुलसी विहार, रमेशवाडी, तर पूर्वेतील शिरगाव, कात्रप, शिवाजी चौक, खरवई नाका आणि कात्रप भागातील जुना पेट्रोल पंपाजवळच्या चौकात अशा दहा ठिकाणी भाजी विक्रेते बसवण्यात आले आहेत.