कल्याण-डोंबिवली शहरांचा विकास झपाटय़ाने होत आहे. येथील नागरिक सुसंस्कृत आहेत, परंतु आरोग्याच्या बाबतीते ते उदासीन आहेत. गेल्या ३०-४० वर्षांत शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला. लोकसंख्येच्या घनतेचा विचार न करता नागरी सुविधांचा वापर होत आहे. त्यामुळे वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी व्यवस्थापने काम करतात. त्याचबरोबर सामान्यांनीही आरोग्याविषयी जागृत राहाणे आवश्यक आहे. प्रत्येकाने काळजी घेतली व काही कठोर नियम पाळले तर आरोग्याच्या समस्या नक्कीच कमी होतील.
मागच्या दोन दशकात शहरांचे नागरीकरण झाले. पर्यावरणाकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. दाटीवाटीने लोक राहत आहेत. त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. १९९०च्या दरम्यान डोंबिवलीत तापाची साथ आली होती. सर्वेक्षणात दूषित पाण्यामुळे टाईफॉईडची साथ शहरात पसरल्याचे निदान झाले. पाण्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे हवा. वाहनांमुळे, कारखान्यांमुळे आणि रस्ते खोदाईमुळे हवा प्रदूषित होते. २०१४-१५ साली तपासलेल्या हवेच्या नमुन्यात प्रमाणापेक्षा जास्त धुलीकण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ध्वनिप्रदूषणाची समस्या जास्त प्रमाणात आहे. डोंबिवलीत काही ठिकाणी शांतता क्षेत्रे घोषित झाली आहेत, परंतु याच परिसरात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण होते. कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी आवाजाची पातळी सतत ओलांडली जात आहे. प्रकाश प्रदूषणाच्या बाबतीत आपण संवेदनशील आजही नाही. एलईडी दिवे लावण्याकडे आज कल आहे. परंतु इतर दिव्यांमुळे नको तेवढय़ा झगमगाटामुळे जैवचक्रावर याचा परिणाम होतो.
या सर्व प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. श्वसनाचे विकार जडतात. सर्दी, पडसे, खोकला, दमा यांसारखे आजार एक महिन्याच्या मुलापासून ते ८० वर्षांच्या नागरिकांपर्यंत सर्वाना होतात. प्रदूषणामुळे ७० ते ८० टक्के रहिवाशांना डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, अस्वस्थता, रात्री झोप न येणे, उच्च रक्तदाब असे आजार आढळतात. दाटीवाटीने इमारती उभ्या असल्याने घरात स्वच्छ प्रकाश, खेळती हवा येत नाही. यामुळे नागरिकांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो. या सर्वाचा परिणाम हा लोकवस्तीशी आहे, परंतु हे कोणी लक्षात घेत नाही. घनकचरा कुजल्याने त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.
डोंबिवलीत ११५ रुग्णालये आहेत, परंतु अत्याधुनिक सोयीसुविधा असतील असे एकही रुग्णालय नाही. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात उपलब्ध होणारी औषधे त्यासाठी जेनरिक मेडिकल, हॉस्पिटल असावे. महिला व मुलांसाठी स्वतंत्र असा एक सुसज्ज असा दवाखाना, अपघात झाल्यास ट्रामा केअर सेंटर, साथीच्या रोगांसाठी प्रत्येक दवाखान्यात स्वतंत्र कक्ष असावा. अशा सुसज्ज सुविधा येथे नाहीत. रुग्णांना ठाणे किंवा मुंबईला न्यावे लागते, त्यासाठी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध होईल यासाठी एक हब तयार करा. देहदान, त्वचादान मंडळे आहेत, परंतु येथे केवळ नोंद होते. देहदान करण्यासाठी मुंबईला जावे लागते. प्रशासनाने यासाठी मोफत रुग्णवाहिका किंवा इतर यंत्रणा उपलब्ध करावी. काही संस्था असे उपक्रम राबविण्यास तयार आहेत, त्यांच्याशी संहकार्य करून काही नियम तयार करून या योजना शहरात राबवाव्यात.
डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबीर, ग्रंथालय शहरात असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ कार्डसारख्या सुविधा राबविता येतील. शहरात मोठय़ा प्रमाणावर हॉटेल आहेत, नागरिक हल्ली बाहेरचे खाणे जास्त पसंत करतात, परंतु या हॉटेलांची तपासणी कधी होते का, त्यांचे प्रमाणपत्र कधी तपासले जाते का, नागरिकही याचा विचार करत नाहीत. स्मार्ट सिटीत प्रत्येक नागरिक स्मार्ट असायला हवा.