ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील बसथांब्यावरील घुसखोरांनी शिस्तबद्ध प्रवाशांची मोठी अडचण केली आहे. कार्यालयातून घरी परतणारे ठाणेकर तासन्तास बसची वाट पाहत उभे असतात. परंतु थांब्यावर बस थांबल्यानंतर रांगेबाहेरील प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी घुसखोरी करीत आहेत. रांगेतील प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. पुन्हा तासभर पाहत राहावी लागत आहे. एकीकडे बेशिस्त प्रवासी आणि उदासीन प्रशासन यांच्या कचाटय़ात सापडलेल्या प्रवासी काही वेळेला हिंसक होऊ लागले आहेत. त्यातून शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्कीचे प्रकार वाढले आहेत. या बेशिस्त प्रवाशांना शिस्तीचा धडा देण्यासाठी परिवहन उपक्रमाने प्रयत्न करावे तसेच अन्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
ठाणे स्थानकाबाहेरील सॅटिसवरून शहरातील छोटय़ा-मोठय़ा २५ मार्गावर सुमारे १०० हून अधिक बसेसच्या चारशेहून अधिक फेऱ्या दिवसभरामध्ये होत असतात. या बस फेऱ्यांद्वारे दिवसभरात दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. याठिकाणी असलेल्या ११ बस थांब्यांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. प्रत्येक थांब्यावर प्रवाशांनी रांग लावावी, अशी अपेक्षा असते. त्यानुसार येथे असणारे वाहतूक कर्मचारी सूचनाही देत असतात. परंतु, अनेक बेशिस्त प्रवाशी बस आल्यानंतर रांग मोडून आत चढण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी प्रवाशांत धक्काबुक्की आणि बाचाबाची होण्याच्या घटनाही घडतात.  अशा प्रसंगी परिवहन प्रशासनसुद्धा लक्ष देत नसल्याने संतप्त प्रवासी परिवहन प्रशासनालाच लक्ष्य करू लागले आहे. काही महिन्यांपूर्वीच येथील परिवहनच्या नियंत्रण कक्षावर हल्ला करून मोडतोड करण्यात आली होती.
अशा घटना क्वचितच घडत असल्याचे परिवहन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र, हिंसक प्रवाशांना रोखण्यासाठी पोलिसांची गरज असून या भागात पोलीस चौकी सुरू झाल्यास येथील बेशिस्तपणा पूर्णपणे रोखला जाऊ शकेल, असे येथील परिवहन कर्मचाऱ्यांनी सांगितले.   

खासगी वाहनांचीही वर्दळ
केवळ बस वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सॅटिसवर खासगी वाहतुकीला पूर्णपणे बंदी आहे. तशी सूचना देणारा फलकही सॅटिसवर होता. मात्र तो फलक गायब झाला असून अनेकदा खासगी वाहने, रिक्षा आणि दुचाकीस्वार सॅटिसवर प्रवास करू लागले आहेत.