वडाला उलटय़ा फेऱ्या मारून महिलांकडून निषेध
भरवस्तीत मलनि:सारण प्रकल्प राबवून साऱ्या परिसराचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रविवारी कळवा येथील पारसिकनगरमधील रहिवाशांनी रस्त्यावर येत जनआंदोलन पुकारले. विशेष म्हणजे वटपौर्णिमेचे औचित्य साधून कुंडीतल्या वडाभोवती उलटय़ा फेऱ्या मारून स्थानिक महिलांनी याप्रसंगी रोष व्यक्त केला. गेली काही महिने सातत्याने येथील नागरिक या मलनि:सारण प्रकल्पास विरोध करीत आहेत. रहिवाशांनी सामूहिकपणे यासंदर्भात वेळोवेळी संबंधित विभागांकडे तक्रारीही नोंदवल्या आहेत. मात्र प्रशासनाने रहिवाशांच्या तक्रारींची दखल न घेता प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे रविवारी रस्त्यावर रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे या प्रशासकीय दंडेलशाहीविरुद्ध निषेध नोंदविला.
या परिसरातील अमृतांगण, नेचर ग्लोरी, समर्थ कॉम्लेक्स आदी अनेक वसाहतींमधील हजारो रहिवाशांना या मलनि:सारण प्रकल्पाचा फटका बसणार आहे. कळवा, खारेगाव, पारसिकनगरला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकीही याच परिसरात आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कळवा, खारीगाव तसेच पारसिकनगरमधील सर्व इमारतींचे सांडपाणी या मलनि:सारण प्रकल्पात जमा होणार आहे. त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत येणारा मोटारीचा आवाज, निर्माण होणारी दरुगधी पर्यावरणाला हानी पोहोचवणारी ठरेल, अशी भीती येथील रहिवासी डॉ. पूनम निहाटकर यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे वायुप्रदूषण होणार असून त्यामुळे त्वचा आणि श्वसनाच्या आजारासह कर्करोगासारख्या गंभीर आजारालाही सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. गरोदर स्त्रियांच्या गर्भावर तसेच लहान मुलांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो, असे डॉ. निहाटकर यांनी सांगितले. परिसराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी आणि या प्रकल्पातील अंतर कमालीचे कमी आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता आणि त्यापासून होणारे आजारही टाळता येऊ शकत नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.