अंबरनाथमधील आठ वर्षांपासून बंद प्रकल्प; प्रदूषण रोखण्यात यश मिळणार

अंबरनाथ : अतिरिक्त अंबरनाथ औद्य्ोगिक वसाहतीतील गेल्या आठ वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद असलेला सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बुधवारपासून अखेर कार्यान्वित करण्यात आला. यापूर्वीच्या कंत्राटदाराने केलेल्या घोळामुळे २०१४-१५ पासूनच हा प्रकल्प बंद पडू लागला होता. त्यानंतर तब्बल आठ वर्षे हा प्रक्रिया प्रकल्प बंद होता. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाचे प्रमाणही वाढले होते, तर अनेक कंपन्यांना सांडपाणी प्रक्रियेचा मोठा भरुदड बसत होता.

राज्यातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतींच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहत गेल्या काही वर्षांत प्रदूषणाच्या प्रकरणांमुळे चर्चेत आली. महाराष्ट्र  औद्योगिक विकास महामंडळाने येथे २००५ साली साडेसात दशलक्ष लिटर क्षमतेचा सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला होता. मात्र कंपन्यांची संख्या पुरेशी नसल्याने २०१३ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्या वेळी नेमलेल्या कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच प्रकल्प व्यवस्थित न चालवल्याने काही महिन्यांतच हा प्रकल्प बंद पडला होता. त्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने हा प्रकल्प अ‍ॅडिशन अंबरनाथ मॅन्युफॅक्चरल असोसिएशनकडे (आमा) सुपूर्द केला होता. त्या वेळी कंपन्यांच्या या संघटनेने प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विविध तांत्रिक बाबी, शासकीय अडथळ्यांमुळे हा प्रकल्प सुरू होऊ  शकला नव्हता. दरम्यानच्या काळात या प्रकल्पाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी क्रिस्टल अ‍ॅक्वाकेम जेव्ही या कंपनीला हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले होते. यातील अडचणी महाराष्ट्र  औद्योगिक विकास महामंडळाचे प्रमुख पी. अनबलगन आणि पर्यावरण मंडळाच्या वरिष्ठांनी दूर करत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी काही कंपन्यांचे सांडपाणी यात सोडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांनी दिली आहे.

नक्की फायदा काय?

गेल्या आठ वर्षांपासून कंपन्यांतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने उद्योग सुरू ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांना स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावे लागले. या प्रकल्पांचा खर्च मोठा असून त्यासाठी प्रतिलिटर एक ते दीड हजार रुपये लागतात. मात्र सामायिक प्रकल्पात हाच खर्च अवघा ३० रुपयांपर्यंत येतो. सामायिक प्रकल्प नसल्याने क्षमता असूनही अनेक कंपन्यांना आपला विस्तार करता येत नव्हता.गेल्या काही वर्षांत अंबरनाथच्या या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषण वाढत असल्याचे आरोप होत होते. काही प्रदूषणकारी कंपन्या रसायने सोडत होती मात्र नक्की हे प्रकार कोण करते हे कळत नव्हते. आता येथील सुमारे १२० कंपन्यांच्या सांडपाण्याची जोडणी प्रकल्पाला केली जाणार असल्याने प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा दावा आमा संघटनेचे उमेश तायडे यांनी केला आहे.