श्रावणातील व्रतवैकल्ये, गौरी-गणपती उत्सव, नवरात्र आणि दिवाळी अशा एकापाठोपाठ एक येणाऱ्या सणांची रेलचेल सध्या सुरू आहे. या सण समारंभाच्या काळात महिलांच्या नटण्याथटण्याला दागिन्यांचीही जोड असते. मात्र, अलीकडच्या काळात इतर दागिन्यांसोबतच सौभाग्य अलंकारामध्येही अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत.
मंगळसूत्र म्हणजे नात्यातील गोडवा, मान, मर्यादा जपणारा अलंकार. पूर्वी लग्नामध्ये घातलेले एक मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी इतकाच काय तो साजशृंगार. कालांतराने स्त्रियांची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलली, तशा दागिन्यांबाबतच्या गरजाही बदलल्या. नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना कमी किमतीचे, पण आकर्षक मंगळसूत्र आवडू लागले. त्यातूनच छोटय़ा मंगळसूत्राची फॅशन आली. तसेच मोठय़ा मंगळसूत्राचेही अनेक नावीन्यपूर्ण प्रकार मिळू लागले आहेत.
मंगळसूत्र म्हणजे कर्तव्य म्हणून गळ्यात घातलेला दागिना असे न राहता आता त्याच्याकडे सौंदर्य वाढविणारा दागिना म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. आता बाजारात मंगळसूत्रांची अनेक आकर्षक डिझाइन्स आल्या आहेत. त्यात दोन पदरी मंगळसूत्र, पट्टीचे मंगळसूत्र, बाहेरून साखळी असणारे, आतून साखळी असणारे मंगळसूत्र असे अनेक प्रकार आहेत. मंगळसूत्रातही आता मीना वर्क, खडी वर्क, कुंदन वर्क असणारी डिझाइन्स उपलब्ध आहेत. १८ इंच ते तब्बल ४० इंच एवढय़ा उंचीचे मंगळसूत्र बाजारात उपलब्ध आहेत. तसेच सोन्याला तगडी शर्यत देण्यासाठी बाजारात हल्ली मायक्रो पॉलिश(बेनटेक्स)चे मंगळसूत्रांची गर्दी आहे. तसेच पारंपरिक काळ्यांमण्यांऐवजी सध्या क्रिस्टल (चमकणारे मणी) मण्यांच्या अधिक वापर केला जातो आहे, अशी माहिती जयश्री कलेक्षनच्या जयश्री रामाणे यांनी दिली.
छोटय़ा मंगळसूत्राला पसंती
नोकरदार स्त्रिया आता लहान मंगळसूत्राला जास्त पसंती देतात. त्यामुळे या मंगळसूत्रांमध्ये असंख्य प्रकार सध्या मिळत आहेत. दोन पदरी, एक पदरी, एक वाटी, दोन वाटी, पेन्डेट अशा अनेक प्रकारांत ही मंगळसूत्रे उपलब्ध आहेत. पाश्चात्त्य शैलीतील वेशभूषेशी जुळवून घेणारी चेनमधील मंगळसूत्रेही बाजारात मिळतात. काळ्या मण्यांचा कमीतकमी वापर, बारीक चेन आणि एक किंवा दोन वाटय़ा अशा स्वरूपात ही मंगळसूत्रे असतात. वाटय़ा नसलेल्या आणि काही काळे मणी असलेली फक्त चेनही मंगळसूत्र म्हणून वापरले जाते. स्वस्त, वजनाला हलके व कोणत्याही ड्रेसवर शोभेल असे मंगळसूत्र बाजारात उपलब्ध आहेत. लहान मंगळसूत्रे कमीतकमी तीन ते साडेतीन ग्रॅमपासून पंधरा-वीस ग्रॅमपर्यंत वजनाची मिळतात. इटालियन पॅटर्नची मंगळसूत्रे हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. यात व्हाइट गोल्ड (प्लॅटिनम) आणि गोल्ड अशा मिश्र रंगामध्ये मंगळसूत्राचे प्रकार आहेत. मॅट फिनिश गोल्ड (कोणत्याही प्रकारची पॉलिश न केलेले) मध्येही अनेक डिझाइन्स आहेत.

मंगळसूत्राच्या सोनसाखळी (चेन)चे प्रकार
हल्ली मंगळसूत्र म्हटलं तर कमी काळे मणी आणि अधिक सोने असे मिश्रण आढळते. त्यातही सोन्याच्या साखळीला अधिक मागणी असते. सोनसाखळीमध्येही करप साखळी हा प्रकार लोकप्रिय आहे. ही अतिशय नाजूक साखळी असते. त्याचप्रमाणे ‘नॅनो डिझायन’च्या सोनसाखळीचीही अधिक चलती असते. अशा चेनमध्ये प्रत्येक आकडय़ात मोहरीच्या आकाराचा मणी वापरला जातो.

सौभाग्याला हिऱ्याचे कोंदण
हिऱ्याच्या अलंकारांना वाढती मागणी पाहून आता अमेरिकन डायमंडनिशी घडवलेल्या मंगळसूत्रांचीही चलती आहे. त्यांच्या पेन्डंटच्या डिझाइनमध्ये नाजूक आणि ठसठशीत असे प्रकार असतात. तर यातल्या पेन्डंटमध्ये मोर, कमळ, फुलं, बदक, चंद्रकोर, आडवे, गोल, चौकोनी असे अनेक आकार पाहायला मिळतात. काळ्या मोठय़ा किंवा झिरो मण्यांच्या एकेरी किंवा दुहेरी पदरांबरोबर ही मंगळसूत्रे खूप छान दिसतात. मुख्य म्हणजे सगळ्या पोषाखांवर उठून दिसत असल्यामुळे नेहमी घालण्यासाठी मुली याचीच निवड करतात. तसेच त्यांच्यासोबत मॅचिंग कानातलेदेखील असल्याने एक वेगळाच साज तयार होतो. याची किंमत २५,००० रुपयांपासून सुरू होते. मात्र, ‘इमिटेशन’ ज्वेलरीतही हे मंगळसूत्र ३५० ते ५५० या किंमतीमध्येही उपलब्ध आहे. अमेरिकन डायमंडच्याऐवजी सोन्याचे एकच पेन्डंट किंवा एक नाजूकशी कलाकुसर केलेली वाटी आणि काळे मणी असं मंगळसूत्रदेखील सगळ्या पेहरावांवर छान दिसतं.

कुंदन व मीना वर्क
रोडियम पॉलिश असणाऱ्या मंगळसूत्रांची डिझाइन्स बाजारात आली आहेत. त्याशिवाय मंगळसूत्राच्या वाटय़ा व पेंडंटमध्येही आकर्षक डिझाइन्स आहेत. त्यात स्टोन, मीनावर्क, रुबी पेन्डंट, फॅन्सी वाटय़ा असे प्रकार आहेत. बजेट मोठे असेल, तर मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये कलाकारीचा उत्तम नमुना पाहायला मिळू शकतो. आजकाल साडीवर मॅचिंग असणारे मंगळसूत्र व कानातले ग्राहकांना हवे असतात. म्हणूनच मोती, कुंदन वर्क, हिऱ्याचे वर्कचे मंगळसूत्रे व कानातले बनवून दिले जातात, अशी माहिती साई सिद्धी ज्वेलर्सचे जाधव यांनी दिली.

नवरात्र स्पेशल मंगळसूत्र
नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाच्या पेहराव घालण्यात येतो. परंतु, आता त्याच रंगाच्या मण्यांना गुंफलेले मंगळसूत्रही बाजारात उपलब्ध आहेत. वरच्या बाजूला काळ्या मण्यांची पोत आणि त्यामध्ये रंगीबेरंगी मण्यांच्या माळांचा वापर ककून जयश्री कलेक्षनने हे मंगळसूत्र बाजारात आणले आहे. या मंगळसूत्राची किंमत ३०० ते ५५० रुपये इतकी आहे.

पोत आणि ठुशी मंगळसूत्र
सणांच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या पोत मंगळसूत्रांना अधिक पंसती आहे. काळ्या मण्यांची चार ते पाच पदरी पोत आणि त्यामध्ये भरगच्च असे पेन्डंट वापरून एक आगळा ‘हौजा मंगळसूत्र’चा प्रकार तयार केलेला आहे. हा प्रकार काहीसा मल्हार मालिकेतील म्हाळसाच्या दागिन्यांवरून तयार केला असल्याचे जयश्री रामाणे यांनी सांगितले. कॉपर लक्ष्मी, मोत्याच्या वापर करून त्यात डाळिंबी रंगाचे खडे वापलेल पेन्डंट वापरले जाते.
’कुठे – सर्व सराफ दुकांनामध्ये तसेच इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांत.
ठिकाण – जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड, बी केबिन, आर मॉल, डोंबिवली मधुबन टॉकीज गल्ली
’किंमत– इमिटेशन -३५० ते १५०० रुपये, सोन्याचे मंगळसूत्र – १५००० च्या पुढे.