लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देश एक असल्याचे दाखविण्यासाठी विशेष अधिवेशन उपयुक्त ठरेल, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या मागणीला पाठींबा दिला आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो काही निर्णय घेतील, त्याला आमचा पाठींबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्याच्या पाचपखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी पवार यांना विचारला. त्यावर भाष्य करत त्यांनी याबाबत मत व्यक्त केले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे. यात अनेक कुटूंबातील नागरिक शहिद झाले आहेत. त्यामुळे देशावरील हल्ल्यात जात, धर्म आणण्याची गरज नाही. कारण, देशवासीय म्हणून आपणाला एकत्र यावे लागेल. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो काही निर्णय घेतील, त्याला आमचा पाठींबा असेल, असे मी यापुर्वीच म्हटले आहे, असे पवार यांनी सांगितले. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपुर्ण देश एकसंघ आहे आणि सर्व पक्ष एकत्र आहेत, हे दाखविण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन हे उपयुक्त ठरेल, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या मागणीला पाठींबा दिला.

ठाकरे बंधु एकत्र आले तर आनंदच

दोन कुटूंब जर एकत्र येत असतील तर, त्यात राजकारण आणण्याची गरज नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी व्यक्त केली.