भाजपच्या गोटात अस्वस्थता

गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी आग्रही मागणी करत मतदारसंघ न मिळाल्यास शिवसेनेच्या प्रचाराचे काम करणार नाही, अशी घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावरचा भाजपचा दावा मोडीत निघाल्याचे बोलले जाते.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून भाजपने दावा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सेना आणि भाजप आमनेसामने आले होते. गेल्या महिन्यात शहरातील प्रमुख भाजपचे पदाधिकारी, महत्त्वाचे नगरसेवक यांनी बैठक घेत हा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी शिवसेनेनेही प्रत्युत्तर देत आपली ताकद ओळखावी, मगच मागणी करावी अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर केली होती. या प्रकरणानंतर सेना-भाजपत आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मात्र युतीची चर्चा सुरू असतानाच भाजप पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकत्र येत मतदारसंघावरचा दाव्याचा पुनरुच्चार केला होता. या वेळी शिवसेनेचा प्रचारही करणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यामुळे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ कोणाच्या पारडय़ात जातो याबाबत कमालीची उत्सुकता होती. मात्र युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या बहुतांश विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. त्यात विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याची बातमी रविवार सायंकाळच्या सुमारास आली. त्या वेळी निष्ठावंत शिवसैनिकांना मतदारसंघात एकच जल्लोष केला. मात्र या बातमीनंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत सध्या अधिकृतरीत्या माहिती समोर न आल्याने शहरातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी यावर बोलणे टाळले आहे. मात्र वरिष्ठांचा निर्णय घेऊनच या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, असेही एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना विधानसभेचे तिकीट मिळाल्याने अखेर या मतदारसंघावरचा भाजपचा दावा मोडीत निघाल्याचे बोलले जात आहे.काँग्रेसकडून रोहित साळवे गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडे असणारा अंबरनाथ विधानसभा हा मतदारसंघ यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाटय़ाला आला आहे. या मतदारसंघावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीनेही दावा केला होता. मात्र सक्षम उमेदवार न मिळाल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल करण्यात आला. उल्हासनगरच्या काँग्रेस नगरसेविका अंजली साळवे यांचे पुत्र रोहित साळवे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे युती आघाडीच्या लढतीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.