ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबई महापालिकेतील युतीच्या निर्णयावरच ठाण्यातील युतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे ठाण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली नव्हती. दरम्यान, मुंबईतील युतीबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे ठाण्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवडय़ात शिवसेनेने सर्वच जागांकरिता इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरित करण्यास सुरुवात केली असून शिवसेनेने आतापर्यंत ६०० अर्ज वितरित केले आहेत. त्यापाठोपाठ आता भाजपनेही इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरित केले असून भाजप कार्यालयातून ६२३ अर्जाचे आतापर्यंत वितरण झाले आहे. हे अर्ज इच्छुक उमेदवारांकडून भरून घेण्याची प्रक्रियाही भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

युती करायची की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. महापालिका निवडणुकांपूर्वी सर्वच जागांसाठी यापूर्वीही अर्ज भरून घेतले जात होते. यंदाही अर्ज भरून घेतले जात आहेत.

नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख

शिवसेनेने अर्ज भरून घेण्यास सुरुवात केल्याने भाजपनेही सर्वच जागांवर अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

संदीप लेले, भाजपचे शहराध्यक्ष