भगवान मंडलिक

डोंबिवली- ४० वर्षापूर्वी भरगच्च शालेय उपक्रम राबवून समाजपयोगी उपक्रमात अग्रभागी असलेल्या सामान्य शिवसैनिकाचे शिवसेना शाखा हे बलस्थान होते. कोणतीही सामाजिक गरीब, श्रीमंत अशी दरी न पाडता शाखेत गुण्यागोविंदाने एक दिलाने सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी समर्पित भावाचे शिवसैनिक धडपडत असत. वर्षभर शाखेचे कोपरे गोरगरीबांसाठी वह्या, शालेय उपक्रमांच्या साहित्यांनी भरलेले असत. भरगच्च सामाजिक उपक्रम पार पाडणाऱ्या शाखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर शाखेवर ताबा कोणाचा या विषयावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे.

शिवसेना शाखा म्हणजे यापूर्वी मार्गदर्शन, साहाय्य करणारे केंद्र होते. शिवसेना शाखांमध्ये सर्व प्रकारची वर्तमानपत्र वाचण्यास ठेऊन वाचकांच्या माध्यमातून शिवसेने विषयी गोडी आणि सदस्य वाढविण्याचा सुप्त उपक्रम त्यावेळी बिनबोभाट सुरू असायचा. सकाळी आठ पासून ते रात्री शाखा बंद होईपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक सकाळपासून शाखेतील वर्तमानपत्र वाचण्यासाठी गर्दी करायचे. वर्तमानपत्रांची दिवसभर हाताळणी होऊन संध्याकाळपर्यंत वर्तमानपत्रांची पाने लूळ पडायची. इतका त्यावेळी शाखेत राबता असायचा.

सकाळी १० वाजल्यानंतर शाखेचा प्रमुख सिंहासन खुर्चीवर आसनस्थ झाला की विविध नागरी, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी असायची. ठाण्याच्या आनंदाश्रमातील पध्दती शाखांमध्ये स्थानिक पदाधिकारी अवलंबत होते. शिवसेना शाखा म्हणजे पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीचे एक न्याय केंद्र मानले जात असे, असे जुने शिवसैनिक कौतुकाने सांगतात.

वह्या साठवण केंद्र

जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी ठाणे परिसरातील शहरे, गाव-आदिवासी पाड्यांमध्ये गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा जम्बो उपक्रम शिवसेेनेकडून हाती घेतला जात होता. तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिवंगत आनंद दिघे यांच्या आदेशावरुन या वह्यांचे काटेकोरपणे वाटप होईल याची काळजी घेतली जात असे. शहर, गावांमध्ये या वह्यांचे गठ्ठे वाहनांमधून आनंद दिघे यांच्या सांगण्यावरुन पाठविले जात होते. या वह्या ठेवण्यासाठी आनंद दिघे यांच्या सूचनेवरुन शहरातील एखादा विकासक आपल्या इमारतीचा गाळा वापरासाठी देत होता. दिघे साहेब यांची सूचना असल्याने विकासक त्या गाळ्याचे भाडे किंवा इतर काही भानगडीत न पडता शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायचा. गाळ्यातील वह्यांचे नियोजन, वाटप या उपक्रमासाठी शिवसैनिक दिवसभर या गाळ्यात बसलेले असायचे. नागरिक आपल्या विविध तक्रारी, समस्या घेऊन शाखेत यायचे. शिवसैनिक आपल्या परीने त्या प्रश्नांची सोडवणूक करायचे.

आनंद दिघे यांच्यासह मुंबईतील शिवसेना नेत्यांचा ठाणे परिसरात दौरा असला की शाखा हेच भेट, बैठकीचे केंद्र असायचे. वर्षभराच्या गाळ्यातील उठबसीनंतर गाळा म्हणजे मग शिवसेना शाखा होऊन जायची. अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी आपल्या मोक्याच्या शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी जागा शाखा म्हणून शिवसेनाला वापरण्यासाठी दिल्या. शाखा म्हणूनच या जागा आता वापरात आहेत. काही जागा मूळ जागा मालकांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

१०० हून शाखांचे प्रश्न

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरात शिवसेनेच्या एकूण १०० हून अधिक शाखा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे समर्थक असे दोन गट पडले आहेत. आता शाखेत कोणत्या गटाने बसायचे यावरुन गेल्या महिन्यापासून धुसफूस सुरू झाली आहे. कल्याण, डोंबिवलीतील ही धुसफूस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येत्या काळात निर्माण करील, अशी भीती शिवसैनिक व्यक्त करतात. बहुतांशी शिवसेना शाखांची पालिकेकडून जाणारी मालमत्ता देयके विकासक, जमीन मालक यांच्या नावे आहेत, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली.

शिवसेना शाखा, तेथील पावित्र्य शिवसैनिकांनी निष्ठेने जपले. त्या शाखांवर सर्जिकल स्टाईक रुपाने हल्ले होऊ लागले. शिवसैनिकांना मारहाण होऊ लागली तर सामाजिक कार्यात यापुढे कोणी पुढे येईल का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

अरविंद बिरमोळे, ज्येष्ठ शिवसैनिक डोंबिवली