विधान परिषदेसाठी रवी फाटक यांना संधी; जुन्याजाणत्या नेत्यांमध्ये नाराजी
विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या एका मोठय़ा गटाकडून झालेल्या असहकारामुळे ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात सपाटून पराभव पत्करावा लागल्यानंतरही शिवसेना नेतृत्वाने विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी पुन्हा रवी फाटक यांना बहाल करत पक्षातील जुन्याजाणत्या इच्छुकांना कात्रजचा घाट दाखविला आहे. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराशी दोन हात करताना निष्ठेपेक्षा आर्थिक क्षमता महत्त्वाची ठरेल हे लक्षात आल्यानेच फाटकांना उमेदवारीचे फाटक खुले करण्यात आल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, फाटकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द ‘मातोश्री’ने पुन्हा एकदा प्रमाण मानला असून त्यांचीही प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागणार आहे.
विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १९९२ पासून वसंत डावखरे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची वर्षांनुवर्षे मोठी ताकद राहिली आहे. असे असतानाही सर्वसमावेशक राजकारणासाठी ओळखले जाणारे डावखरे यांनी विजयाचे गणित अनेकदा आपल्या बाजूने झुकविल्याचे दिसून आले. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ यंदा शिवसेना-भाजपच्या बाजूने असल्याने डावखरे यांना कडवी लढत देण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू होती. उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातून कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाण्यातील नगरसेवक नरेश म्हस्के, नेहमीचे दावेदार अनंत तरे अशी काही नावे चर्चेत होती. मात्र, मतांची जुळवाजुळव करताना होणाऱ्या घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता आर्थिक रसद उभी करू शकेल, असाच उमेदवार निवडला जाईल असे स्पष्ट होते.
कॉँग्रेस नेते नारायण राणे यांना सोडचिठ्ठी देऊन दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र फाटक यांच्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भलतीच मर्जी जडल्याचे यावेळी पुन्हा सिद्ध झाले आहे. विधानसभा निवडणुकीत ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यातून फाटक यांना उमेदवारी मिळवून देऊन शिंदे यांना तोंडघशी पडावे लागले होते. राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये असताना फाटक यांना कोकणात अवघ्या ३५ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. ठाणे सेनेचा गड असताना ते पराभूत झालेच, शिवाय विधान परिषदेत याच मतदारसंघातून त्यांना डावखरे यांनी एकदा धूळ चारली आहे. असे असताना सुमारे एक हजारांच्या आसपास असलेल्या मतदारांवर होणारा घोडेबाजार लक्षात घेऊन जुन्या जाणत्यांना मागे सारूनपुन्हा फाटक यांना उमेदवारी मिळाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2016 रोजी प्रकाशित
राजकीय घोडेबाजाराचे फाटक खुले!
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १९९२ पासून वसंत डावखरे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-05-2016 at 04:39 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena declares candidates for vidhan parishad