शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. या वेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार करीत असताना त्यांची मिमिक्रीदेखील केली. या मिमिक्रीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पिकला. या वेळी उपस्थितांनी वन्स मोअरचे नारे देत, पुन्हा एकदा मिमिक्री करण्याची विनंती केली.

आमची सत्ता आल्यानंतर शिंदे गटाच्या हस्तकांना तुरुंगात टाकणार!

“आमच्या मोर्चाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १७ अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? का गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले असता पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. फेसबुकवर फक्त एक पोस्ट टाकली म्हणून तुम्ही महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करता. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत, आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत, कारण ते ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. आज अधिकारी जागेवर नाहीत, महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर गुजरात, गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून काही तासांचे आहे. सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला जे कुणी आयएएस, आयपीएस अधिकारी मदत करत आहेत. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जे लोक सरकारचे चिलटे म्हणून काम करीत आहेत, त्यांना आमची सत्ता आल्यानंतर तुरुंगात टाकले जाईल. ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवू. हाच निश्चय करण्यासाठी आज आम्ही आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहोत.”

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली आणि लोक म्हणाले, ‘वन्स मोअर’

या वेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, “शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात.” या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, वन्स मोअर नाही, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात, त्यांना परत येऊ द्यायचे नाही.