जयेश सामंत

ठाण्यात  महाविकास आघाडीवरून शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात रंगलेल्या टोलेबाजीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष सातत्याने उघड होऊ लागला आहे. 

ठाण्यावर एकहाती सत्ता हेच आमचे लक्ष्य – नरेश म्हस्के

ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रत्येक कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचे दाखले देतात. परंतु या मैत्रीला स्वार्थाची झालर आहे. महापालिका निवडणूक आघाडी करण्यासाठी आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हा मैत्रीचा बनाव रचला जात असला तरी ठाणे महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता हेच आमचे लक्ष्य आहे, असे स्पष्ट मत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. ठाण्यातील एकाही शिवसैनिकाला, नगरसेवकला तसेच पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी नको आहे. आम्ही या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या आहेत, असेही महापौर म्हणाले.

खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात रंगलेल्या राजकीय टोलेबाजीनंतर गेले दोन दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ठाण्यातील नेत्यांमध्येही कलगीतुरा रंगला आहे. याविषयी महापौर म्हस्के यांनी निवडणुकीत आघाडी नकोच या आपल्या भूमिकेचा लोकसत्ताशी बोलताना पुनरुच्चार केला. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी होणार किंवा नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे घेतीलच. मात्र शिवसैनिक या नात्याने आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. शिवसेनेत कुणालाही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना ही आघाडी व्हावी असे वाटते त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा दाखला देत असतात. परंतु त्यांची ही मैत्री किती निर्मळ आहे हे सर्वसामान्य जनतेला तर माहिती आहेच. एरवी सगळीकडे दोस्तीचा गजर करत फिरायचे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतलेल्या विकासकामांमध्ये पडद्यामागून काडय़ा घालायच्या हे उद्योग मैत्रीचे नसतात. हे स्वार्थी राजकारण शिवसैनिकांना कळत नाही अशा भ्रमात कुणी राहू नये, असा टोला महापौरांनी लगाविला.

‘मिशन कळवा’ राजकीयच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी आम्ही मिशन कळवा हाती घेण्याची घोषणा केली तशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चलबिचल वाढली. हे मिशन कळवा काय आहे, असा सवाल आव्हाड उपस्थित करतात. कळव्यातील लोकांची कामे करण्यासाठी अधिकाधिक संख्येने नगरसेवक निवडून आणणे हेच मिशन कळवा आहे आणि ते फत्ते केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला. यंदा आम्हाला संधी मिळाल्यास मिशन कळवा काय आहे हे दाखवून देऊच असा इशारा महापौरांनी दिला.