पूर्व विभागात स्मशानभूमी, भाजी मंडई, नाटय़गृह आदी गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचीच री ओढत शिवसेनेने शुक्रवारी अंबरनाथ शहरासाठी आपला नवा जाहीरनामा पत्रकार परिषदेत जाहीर केला. गेली २० वर्षे पालिकेत प्रमुख सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने रखडलेल्या अथवा प्रत्यक्षात साकार न होऊ शकलेल्या प्रकल्पांबाबत आघाडी शासनाला जबाबदार धरले आणि केलेल्या कामांचा पाढा वाचला.
वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था आदी शहराच्या प्रमुख समस्या आहेत. त्यातील फक्त रस्त्यांची अवस्था आता काही प्रमाणात सुधारली आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने रस्ते काँक्रिटीकरण मोहीम राबवून शहरातील प्रमुख रस्ते डांबरमुक्त केले आहेत. प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, वडवली विभागात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खुले नाटय़गृह, हुतात्मा चौकात मधु मंगेश कर्णिक साहित्य पार्क, ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळा (ओपन जिम), कै. शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृह आदी झालेल्या कामांची यादीच सत्ताधारी पक्षाने प्रचारात आणली आहे. असे असले तरी अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत अथवा प्रत्यक्षात साकार होऊच शकलेले नाहीत. शिवाजी चौकातील य. मा. चव्हाण खुले नाटय़गृहाच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या वाहनतळ तसेच नाटय़गृह प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी स्थानकाजवळ असलेले मैदान घालविल्यामुळे सर्वसामान्य अंबरनाथकर हळहळत आहेत. सत्तरच्या दशकात सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली पूर्व आणि पश्चिम विभागातील वेलफेअर सेंटर्स डागडुजीअभावी जमीनदोस्त झाली आहेत. आता नव्या जाहीरनाम्यात त्या पूर्ण होऊ न शकलेल्या प्रकल्पांबरोबरच एलईडी पथदिवे, सुसज्ज क्रीडांगण, प्रशासकीय इमारत आदींचा समावेश केला आहे.