नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ येथे सुरू झालेला ‘शिवमंदिर फेस्टिव्हल’ हा शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाचा उत्तम नमुना ठरला आहे. महोत्सवाची संपूर्ण तयारी करून तो यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नेत्यांना काम लावून त्यांच्याकडे पक्षाच्या ‘प्रसारा’चे काम पूर्ण करवून घेण्यात जिल्हा नेतृत्व यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. दिग्गज कलाकारांच्या कलेचा आस्वाद नागरिकांना घडवून आणतानाच पक्षाचे शक्तिप्रदर्शन कसे होईल, याकडेही शिवसेना नेत्यांनी चांगलेच लक्ष ठेवल्याचे या महोत्सवातून दिसून आले आहे.
पालकमंत्री एकनाथ िशदे यांचे खासदारपुत्र डॉ. श्रीकांत िशदे यांच्या लोकसभा मतदारसंघाचा अंबरनाथ हा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे नगरपालिकेची निवडणुके िशदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. हे लक्षात घेऊन शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्य़ातील संघटनात्मक ताकद याठिकाणी पणाला लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
अंबरनाथ येथील ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ मोठय़ा दिमाखात पार पडला. पंडित जसराज, गायक हरिहरन, वादक शिवामणी, साबरी बंधू आणि गायिका रेखा भारद्वाज आदी दिग्गज कलावंतांनी या ‘फेस्टिव्हल’मध्ये अदाकरी सादर केली.
याचवेळी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांवर शक्तीप्रदर्शनाची जबाबदारी सोपवलेली होती. यात कार्यकर्त्यांनीही कोणतीही कसूर ठेवलेली नव्हती. प्रत्येक कामावर शिवसेना कार्यशैलीची छाप पडलेली होती.
या भागातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ नगरपालिका यांनी मिळून सुरू केलेला हा फेस्टिव्हल म्हणजे शिवसेनेचा सांस्कृतिक मेळावा ठरवा, अशा स्वरूपाचे चित्र पाहावयास मिळाले. महाशिवरात्रीचे निमित्त साधून शिवमंदिर परिसरात झालेला जत्रौत्सवात भगव्या झेंडय़ांनी भरून गेला होता.
या उत्सवात भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, ठाणे येथून झाडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्यापासून राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार राजन विचारे, तर पक्षाचे जिल्ह्य़ातील सारे आमदार, विद्यमान महापौर, नगरसेवक अशा साऱ्याच नेत्यांनी महोत्सवाला हजेरी लावली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांनीही या महोत्सवासाठी उपस्थिती दाखवली. अंबरनाथमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात ‘शिवाचा आशीर्वाद आहेच आता अंबरनाथकरांचा हवा आहे’, असे सूचक वक्तव्य करत एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडला.
‘महोत्सवातही राजकारण दिसते’
महोत्सवात ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, ठाणे, कल्याण – डोंबिवलीचे आयुक्तांनीही हजेरी लावली. आयोजनासाठी अंबरनाथ नगरपालिकेची यंत्रणा राबविण्यात आली. शहरातील प्रमुक रस्ते यानिमित्ताने चकाचक करण्यात आले. या महोत्सवात सुशोभीकरणासाठी सुमारे ८०० कुंडय़ा मात्र कोठून आणण्यात आल्या याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या मदतीची खमंग चर्चाही सुरू झाली आहे. याविषयी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला असता कुणीही याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ‘तुम्हाला कलामहोत्सवातही राजकारण दिसत असेल तर आम्ही काय करायचे’, असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केला.
संकेत सबनीस, अंबरनाथ