ठाणे : भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावल्याने शहरात वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच, याच मुद्द्यावरून समाज माध्यमांवर आमदार केळकर यांचे कौतुक करणारा संदेश एक कडवट शिवसैनिक या नावाने प्रसारित झालेला असून त्यात आनंद दिघे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार केळकर हे निस्वार्थीपणे काम करीत असल्याचे म्हटले आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. असे असतानाच, ठाण्यात भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या उत्सवात विचारे यांनी केळकर यांचा सत्कार केला. त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित होताच त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, टेंभी नाका तसेच विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला गेली २५ वर्षे उपस्थिती लावून देवीचे घेत असून देवी दर्शनाचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा…गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात

राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावण्याच्या मुद्द्यावरून एक कडवट शिवसैनिकांच्या नावाने समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित झाला आहे. यामध्ये संजय केळकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. राजन विचारे हे दरवर्षी चैत्रात देवीची स्थापना करतात. या भक्तिमय सोहळ्यास सर्वच ठाणेकर उपस्थिती लावतात. भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही या उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि विचारे यांनीही त्यांचा प्रथेप्रमाणे सन्मान केला. परंतु मीडियाने मात्र ही भेट राजकीय भेट म्हणून लावून धरली आणि या भेटीने राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर केळकर यांनी ठाण्याची संस्कृती जपली. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नसावेत हे त्यांनी दाखवून दिले. तसेही केळकर हे देवीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षांपासून तिथे दर्शनास जात आहेत. यात कुठेही राजकारण दिसत नाही. याला लागते ते मोठ मन आणि ते केळकर यांनी दाखवले. आनंद दिघे यांच्यानतर खऱ्या अर्थाने केळकर हे निस्वार्थी पणे काम करत आहेत. केळकर यांना सलाम, असे संदेशात म्हटले आहे.