आदित्य ठाकरे नाही तर ‘या’ आमदाराला बनवा मुख्यमंत्री; ठाण्यात बॅनरबाजी

आदित्य ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करणारे अनेक बॅनर्स वरळीमध्ये निकालानंतर झळकले होते

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एक शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल असं वचन आपण बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच्या एका भाषणात केले होते. त्यामुळे सेनेकडून युवासेनाप्रमुख आणि वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगील आहे. आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करणारे अनेक बॅनर्स वरळीमध्ये दिसून आले. मात्र आता अशाप्रकारची बॅनरबाजी ठाण्यातील एका आमदारासाठी होत असताना दिसत आहे.

ठाण्याचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवावे अशी मागणी करणारे पोस्टर्स ठाण्यात लागले आहेत. येथील कोलबाड परिसरामध्ये मराठी वाहतूक व्यापारी सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशा मागणीचे बॅनर्स लावले आहेत. ‘आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना’ असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची बैठक झाली त्यामध्ये शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यातच आता हे पोस्टर ठाण्यामध्ये झळकल्याने राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर युतीमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. निकाल लागून ११ दिवस झाल्यानंतरही कोणत्याही पक्षाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. त्यातच दिवसोंदिवस शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आगामी काही दिवसांमध्ये राज्यात कोणाचे सरकार येणार याबद्दलचे चित्र स्पष्ट होईल असे मत प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच आता भाजपा अपक्षांच्या मदत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार की शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या मदतीने राज्यात स्वत:चा मुख्यमंत्री बसवणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena eknath shinde should get cm post banners in thane scsg

Next Story
पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी यश
ताज्या बातम्या