बाजारपेठा सजल्या

पणत्या, कंदील, विद्युत रोषणाई, घर सजावटीच्या वस्तू यामध्येही नवनवीन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध झाले  आहेत.

पूर्वा साडविलकर

दिवाळी सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे बाजारपेठा ग्राहकांसाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहन खरेदीच्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागले होते. मात्र, यंदाच्या वर्षी करोना प्रादुर्भाव कमी झाला असून राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. यामध्ये सर्व बाजारपेठा रात्री १० वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी मिळाली. ऐन सण-उत्सवाच्या कालावधीत बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे ठाणे शहरातील जांभळीनाका, गावदेवी, नौपाडा या भागांत सायंकाळच्या वेळी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळी सण हा सर्वच सण-उत्सवामध्ये महत्त्वाचा मानला जातो. रोषणाईचा सण म्हणून या सणाची ओळख आहे. या सणाच्या दहा ते पंधरा दिवस आधीपासून बाजारात उत्साहाचे वातावरण असते. दरवर्षी या सणानिमित्त बाजारात नवनवीन प्रकारचे कपडे, कंदील, रोषणाईचे साहित्य, पणत्या, घर सजावटीचे साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतात. मागील वर्षी दिवाळी सणावरही करोनाचे सावट असल्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला होता. यंदाच्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे बाजारपेठ पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. ठाणे शहरातील बाजारपेठ कपडे खरेदीसाठी मुख्य मानली जाते. या बाजारात सकाळ-संध्याकाळ ग्राहकांची गर्दी असते. या बाजारात यंदा दिवाळीनिमित्त महिलांसाठी कपडय़ांमध्ये कुर्ता विथ प्लाझो, कुर्ता विथ हेवी दुपट्टा, कुर्ता विथ पॅण्ट आणि दुपट्टा ह  नवा ट्रेंड आला आहे. तर, पुरुषांसाठी विविध रंगांमध्ये प्लेन तसेच डिझाइनर शॉर्ट आणि लाँग कुर्ते विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच महिलांसाठी साडय़ांमध्येही नवनवीन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांना दुकानात आल्यावर प्रसन्न वाटावे यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानाच्या प्रवेशद्वारावर तसेच आतमध्ये आकर्षित अशी फुलांची तसेच फुग्यांची सजावट केली आहे. तसेच ग्राहकांना कपडे खरेदीवर विविध सवलती देण्यात येत आहेत. दिवाळीच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहन खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळे या वस्तूंच्या दुकानातही ग्राहकांना आकर्षित करतील अशा सवलती देण्यात आल्या आहेत. जुन्या वस्तू द्या शून्य डाऊनपेमेंटवर नवीन वस्तू घ्या, लोनवर फोन अशा सवलतींचे फलक तसेच स्टिकर बाजारातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाबाहेर लावले असल्याचे दिसून येत आहेत. तर, वाहन खरेदीवरही विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतींमुळे ग्राहकांचीही खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे. त्यासह, दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पणत्या, कंदील, विद्युत रोषणाई, घर सजावटीच्या वस्तू यामध्येही नवनवीन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध झाले  आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सकाळ-संध्याकाळ ठाणे शहरातील बाजारात झुंबड उडत असल्याचे चित्र आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shopping before diwali festival diwali shopping zws

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद