कोव्हॅक्सिनचे केवळ २०८० डोसच शिल्लक
ठाणे : महापालिकेकडे कोव्हिशिल्डचे ६३ हजार ६७० डोस उपलब्ध असून ते पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनाने राखून ठेवले आहेत. तर कोव्हॅक्सिनचे केवळ २०८० डोस शिल्लक असून हा साठा एक दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे करोना लसीकरण मोहीम थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्दय़ावरून सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ झाला तर महापौर नरेश म्हस्के यांनी लशीचा साठा देण्याची मागणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे केली.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात ५० हून अधिक लसीकरण केंद्रे पालिकेने सुरू केली आहेत. महापालिकेला आतापर्यंत कोव्हिशिल्डचे एकूण १ लाख ६२ हजार ५०० डोस उपलब्ध झाले असून त्यापैकी ९४ हजार ४२ डोस देण्यात आले आहेत. तर ६३ हजार ६७० डोस शिल्लक आहेत. तसेच कोव्हॅक्सिनचे एकूण ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले असून त्यापैकी १८ हजार ३९५ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तर २०८० डोस शिल्लक आहेत. याच मुद्दय़ावरून सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. कोपरीतील केंद्र का बंद करण्यात आले, असा प्रश्न भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी बैठकीत केला. त्यावर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी कोव्हॅक्सिनचे केवळ २ हजार डोस शिल्लक असल्याची माहिती दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ८ ते १० हजार नागरिकांचे लसीकरण केले जात होते. परंतु लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील काही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर काही केंद्रे एक ते दोन दिवस आड सुरू ठेवली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. हाच मुद्दा पकडून लशीचा तुटवडा का निर्माण झाला, असा प्रश्न भाजप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी विचारला. त्यावर केंद्राकडून पुरेसा साठा राज्य सरकारला मिळत नसल्याने आणि त्यामुळे राज्याकडूनही महापालिकेला कमी साठा येत असल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी केला. यावरूनच शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
लशीचा साठा देण्याची मागणी
ठाणे महापालिका क्षेत्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे एकूण १ लाख १२ हजार ४३७ लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या डोसची संख्या आणि लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता हे डोस अपुरे पडणार असल्याने याचा परिणाम लसीकरणावर होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेला लशीचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
