तुटपुंजे मानधन मिळते, असे सांगत ठाणे महापालिकेच्या पाच प्रसूतिगृहांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रसूतिगृहांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना एका शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये मिळतात. मात्र ही रक्कम कमी असल्याचे सांगत त्यांनी पालिका प्रसूतिगृहांकडे पाठ फिरविली. त्यामुळे अनेक प्रसूतिगृहांमध्ये शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. अगदी सीझर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या महिलांना आवश्यक सुविधा पुरविण्यातही आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सर्व प्रसूतिगृहांमध्ये सिझेरियनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची भरती करण्याचा विचार सुरू केला असून यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवला आहे.
कोपरी भागातील प्रसूतिगृहामध्ये दाखल झालेल्या एका गरोदर मातेचे सिझेरियन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिला कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र कळवा रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचे बाळ दगावले होते. या घटनेनंतर प्रसूतिगृहामध्ये सिझेरियन करण्यासाठी डॉक्टर नसल्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला, तसेच या मुद्दय़ावरून लोकप्रतिनिधींनीही आरोग्य विभागावर टीका केली आहे.
प्रसूतिगृहातील सिझेरियनकरिता डॉक्टर मिळावेत म्हणून डॉक्टरांना पाच हजार रुपये मानधन ठरविण्यात आले. त्यासंबंधी तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र मुदतवाढ देऊनही त्यास डॉक्टरांचा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.