नागपंचमी.. रक्षाबंधन.. कृष्ण जन्माष्टमी.. गोपाळकाला.. अशा वेगवेगळ्या सणांची रेलचेल असलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून श्रावण महिन्यामध्ये बाजाराला नवी झळाळी प्राप्त होत असते. श्रावणातील सोमवार धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाचा मानला जातो. अनेक व्रतवैकल्ये या निमित्ताने महिला वर्गाकडून केली जातात. त्यामुळे देवपूजेसाठी महत्त्वाचे असलेल्या वस्तूंची मागणी या काळात कमालीची वाढत असून फुलबाजारातही गर्दी उसळू लागली आहे. या काळात विविधरंगी फुले, केळीची पाने, तुळशीची पाने, फळे अशा साहित्याची रेलचेल दिसून येते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या खरेदी करणाऱ्या बहिणींची लगबगही बाजारात वाढली आहे. अंबरनाथ शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. श्रावणातील सण, उत्सव, बाजारातील वैशिष्टय़े आणि मंदिरातील गर्दी यांचे दर्शन घडवणारी ही चित्रमाला..