धडक मोहिमेमुळे गावठी दारूचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटले

ठाणे ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांनी गावठी दारूविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे गावठी दारूचे उत्पादन सुमारे ९० टक्क्यांनी घटले आहे. याचा परिणाम म्हणून सरकारमान्य देशी आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या खपात लक्षणीय वाढ झाली आहे. देशी दारूचा खप १२ टक्क्यांनी आणि विदेशी दारूचा खप ७ टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबईतील मालवणी येथे गावठी दारू दुर्घटनेनंतर गावठी दारूविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतलीच होती, शिवाय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा धडाकाच लावला होता. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ात गावठी दारूचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गावठी दारू मिळत नसल्याने तळीरामांनी आपला मोर्चा आता सरकारमान्य देशी आणि भारतीय बनावटीच्या विदेशी दारूकडे वळवला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभागाने मीरा-भाईंदर शहरातील दारूविक्रीच्या दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगत दारूविक्रीवर बंदी घातल्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत दारूविक्रीची दुकाने आणि बार बंद राहिले होते. महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाना वगळण्याची सवलत सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून दारूविक्री दुकाने आणि बार पुन्हा सुरू झाले. त्यामुळे या तीन महिन्यांतील दारूविक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा फरक सहज लक्षात येतो.

देशी अथवा विदेशी दारूच्या खपात वाढ होणे स्वागतार्ह नसले तरी नागरिकांच्या जिवाला थेट धोका पोहोचवणाऱ्या गावठी दारूचे जवळपास पूर्णपणे उच्चाटन झाले आहे ही समाधानकारक बाब आहे. यामुळे शासनाच्या महसुलातही वाढ झाली आहे.

– अभिजीत देशमुख, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, ठाणे सी विभाग

* देशी दारूच्या विक्रीत तब्बल १२ टक्क्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एरवी दारूविक्रीत २ ते ४ टक्क्याने वाढ होत असते या पाश्र्वभूमीवर १२ टक्के वाढ ही दखल घेण्याइतपत आहे. मीरा रोड येथील लवेश वाइन्सचे मालक गोपी नायडू यांनी देशी दारूच्या मागणीत वाढ झाल्याचे सांगितले.

*भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीत ७ टक्के वाढ झाली आहे. देशी दारूच्या तुलनेत ही वाढ कमी असली तरी विदेशी मद्याच्या किमती देशी दारूपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने या वाढीमुळे सरकारच्या महसुलात घसघशीत वाढ झाली आहे.

ड्रोनची कामगिरी महत्त्वाची

गावठी दारूच्या भट्टय़ांवर कारवाई करण्यात पोलिसांना ड्रोन कॅमेऱ्याची महत्त्वपूर्ण मदत झाली आहे. मीरा-भाईंदरमधील उत्तन ते राई-मुर्धा परिसरात मोठय़ा प्रमाणात हातभट्टय़ा लावल्या जात होत्या, परंतु हातभट्टय़ा लावण्याची ठिकाणे गावाबाहेर दाट जंगलात असायच्या. बाहेरून याठिकाणी भट्टी आहे हे याचा थांगपत्ताही लागत नसे. त्यामुळे हातभट्टय़ांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याची कल्पना पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना सुचली. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधीतून पोलिसांना ड्रोन कॅमेरे दिले. या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने दाट झाडाझुडपात तसेच दलदलीत असलेल्या भट्टय़ा पोलिसांनी सहज शोधून काढल्या आणि त्या उद्ध्वस्त केल्या. उत्पादन शुल्क विभागानेही २०१६ मध्ये याप्रकरणी ३७ गुन्हे दाखल करून १२ लाख ३५ हजार ७३९ रुपये किमतीची गावठी दारू पकडली. २०१७ मध्ये त्याचे प्रमाण खूपच खाली आले. त्यावेळी एकंदर ११ गुन्हे दाखल करून १३ हजार ८८९ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.