जागोजागी झालेल्या अतिक्रमणांमुळे ठाणे शहरातील मोकळ्या जागा शोधूनही सापडणे कठीण झाले असताना हाताच्या बोटावर शिल्लक उरलेल्या मैदानांवर आता वेगवेगळ्या महोत्सवांचे अतिक्रमण होऊ लागल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात आधीच मोकळ्या जागांचा दुष्काळ असताना कोपरी परिसरातील दौलतनगर भागातील एका मैदानातून स्थानिक खेळांना हद्दपार करत अशाच एका ‘सिंधी’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत या मैदानात अ‍ॅथलॅटिक्सचे खास प्रशिक्षण वर्ग सुरू असतात. याशिवाय क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल यांसारख्या खेळांसाठी या परिसरातील खेळांडूना हे एकमेव हक्काचे ठिकाण आहे. असे असताना ‘सिंधी’ महोत्सवाच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रेती, विटांचे थर रचले जात असून भर मैदानात बांधकाम केले जात असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे तीव्र सूर उमटू लागले आहेत.  
ठाणे महापालिकेने विकास आरखडा तयार करताना शहरातील वेगवेगळ्या भागांत खेळाची मैदाने आरक्षित केली. मात्र, यापैकी बरीचशी मैदाने आणि मोकळ्या जागा भूमाफियांनी गिळली आहेत. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मैदाने शिल्लक आहेत. या मैदानांमध्येही आता उत्सव आणि महोत्सव भरविण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे ही मैदाने खेळांसाठी काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याने महोत्सवाचे खेळांवर अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे.
खेळायचे कुठे?
संत तुकाराम क्रीडांगणात एका संस्थेमार्फत दररोज सायंकाळी अ‍ॅथलॅटिक्सचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतात. परिसरातील मुले या मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल यांसारखे खेळ खेळतात. उन्हाळी सुटीत या मैदानात खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी असते. सिंधी महोत्सवाकरिता तब्बल २० दिवस मैदान बंद ठेवण्यात येणार असल्याने आम्ही खेळायचे तरी कुठे? असा सवाल येथील मुले उपस्थित करत आहेत. याप्रकरणी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी मोबाइल उचलला नाही.
* दौलतनगर भागात संत तुकाराम क्रीडांगण असून या भागातील मुलांना खेळण्यासाठी ही एकमेव मोकळी जागा आता शिल्लक आहे.
* या मैदानात सध्या ‘सिंधी कल्चर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून ‘सुनहरी सिंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मैदानात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
* महोत्सवासाठी मैदानात रेती, विटा आणि सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे मैदानाची पूर्ण वाताहत झाली आहे.
* या महोत्सवाकरिता आयोजकांनी २० दिवस मैदान आरक्षित केले आहे. त्यामुळे हे मैदान खेळांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
* विशेष म्हणजे मैदाने वाचविण्याचा संकल्प करणाऱ्या ठाणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.