लाखो नागरिक अजूनही लसीकरणाविना; जिल्ह्यात ३७ लाख नागिरकांची पहिली मात्रा पूर्ण

पूर्वा साडविलकर
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेला वेग आला असला तरी लशीचा पहिला डोस घेणाऱ्या १८ वर्षांपुढील नागरिकांचे प्रमाण आणखी वाढविण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे कायम आहे. जिल्ह्यातील ३७ लाख ७५ हजार ९२८ नागरिकांची करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा पूर्ण झाली आहे. आरोग्य यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ७३ लाख ४३ हजार ७९१ लाभार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. हे लक्षात घेता अजूनही मोठय़ा संख्येने नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

काही केंद्रांवर अॉनलाइन पद्धतीने तर इतर सर्व केंद्रांवर वॉक इन पद्धतीने लसीकरण मोहीम सुरू आहे. अॉनलाइन नोंदणी करणे शक्य होत नसल्यामुळे अनेकजण वॉक इन पद्धतीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. अनेकदा लसीकरण केंद्रांवर लशीच्या साठय़ाच्या तुलनेत नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे  कूपन मिळत नसल्यामुळे अजूनही अनेकांच्या पदरी निराशा येत आहे. ठाणे जिल्ह्यात १८ वर्षांपुढील नागरिकांची संख्या ७३ लाख ४३ हजार ७९१ असून आतापर्यंत यापैकी केवळ ३७ लाख ७५ हजार ९२८ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. १२ लाख ७१ हजार ६७७ नागरिकांच्या लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील लाभार्थी नागरिकांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात लशीचा प्रचंड तुटवडा भासू लागला आणि लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचे दिसून आले. या काळात नागरिकांची लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. परंतु गर्दीच्या तुलनेत लससाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना लसविनाच परतावे लागत होते. त्यानंतर, अॉगस्ट महिन्यापासून जिल्ह्याला आठवडय़ातून दोन ते तीन वेळा लशीचा साठा उपलब्ध होऊ लागला आणि लसीकरण मोहिमेला वेग आला.  ठाणे जिल्ह्यत सध्या दिवसाला १५ ते ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

लाभार्थीच्या तुलनेत लसीची एकही मात्रा घेतली नसलेल्या नागरिकांचा आकडा नक्कीच चिंताजनक असला तरी यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्या नागरिकांना करोनाची बाधा झाली होती अशांच्या लसीकरणासाठी काही अवधी आखून देण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून काही भागात  विशेषत: ग्रामीण भागात ही मोहीम मंदावली होती. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात या मोहिमेने वेग धरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग