लहान वयातील मुले अतिशय जिज्ञासू असतात आणि त्यामुळे ती सारखे प्रश्न विचारतात. खरे तर बरेचसे प्रश्न हे सूर्य, चंद्र, तारे, झाडे, पाने, फुले इ.विषयी असतात. बी लावले की झाड कसे येते? पाऊस कसा पडतो? चांदोबा सकाळी का येत नाही? त्यांच्या आजूबाजूला जे घडत असते किंवा ज्या क्रिया घडतात त्यांचे ती बारकाईने निरीक्षण करीत असतात, टीपकागदासारखे सगळे टिपत असतात. त्यामुळेच कुतूहलापोटी त्यांना खूप काही मुळातून जाणून घ्यायचे असते आणि त्यांचे समाधान करणे हे पालकांना बऱ्याचदा अवघड जाते. काही वेळा मग या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घातले जात नाही. खरे तर भविष्यातील संशोधक, शास्त्रज्ञ तयार होण्याच्या प्रक्रियेचा तो आरंभबिंदू असू शकतो (न्यूटनच्या निरीक्षण वृत्तीतूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला हे तर सर्व जण जाणतातच). निसर्गातल्या विविध घटना किंवा क्रिया यामागे विज्ञान आहे. मुलांना जर प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानातील संकल्पना स्पष्ट केल्या तर त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, जिज्ञासू वृत्तीची जोपासना होते आणि तर्कसंगत विचार करण्याचीही सवय लागते.
मुलांची ही गरज लक्षात घेऊनच ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट संस्थेतर्फे छोटे न्यूटन हा उपक्रम जाणीवपूर्वक राबवला जात आहे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालताना, विज्ञानातील (संकल्पना/ प्रत्येक गोष्टीमागील) विज्ञान मुलांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजून सांगायचे असा उद्देश यामागे आहे. मुले जेव्हा स्वकृतीतून, स्वयंनिरीक्षणातून प्रयोगाद्वारे शिकतात तेव्हा ती अधिक परिणामकारकरीत्या शिकतात. शिवाय अशा तऱ्हेने जे ज्ञान प्राप्त होते ते कायमस्वरूपी राहते. अशा तऱ्हेने विज्ञान विषयाचा परिचय हसतखेळत शिक्षणाच्या माध्यमातून होत असल्याने विज्ञान विषयाची आवड निर्माण होईल व त्याची धास्तीही वाटणार नाही.

छोटा न्यूटनमध्ये (मोठा शिशू ते इ.२री) छोटा गट आणि मोठा गट (इ. ३री व ४थी) असे दोन गट आहेत. साधारणपणे विषय सारखेच असतात. फक्त वय लक्षात घेऊन त्या त्या गटाला माहिती दिली जाते. हवा, हवेचे अस्तित्व, हवेचा दाब, हवेतील वायू अशा तऱ्हेने मोठय़ा गटाला माहिती दिली जाते. तर छोटय़ा मुलांना फुगा फुगवायला दिला जातो. मग फुगल्यानंतर तो फुटतो. अशा कृतीतून हवेची माहिती दिली जाते. मेणबत्ती पेटते पण त्यावर ग्लास घातला तर ती विझते. त्यामागील कारण समजावून सांगितले जाते.
मुलांना पाऊस आवडतो. पण पाऊस कसा पडतो? ते सांगण्यासाठी जलचक्र, दूषित/ स्वच्छ पाणी, मृदू व कठीण पाणी , मग पाण्यात विरघळणारे  न विरघळणारे घटक, हे सगळे समजावून आणि प्रात्यक्षिकासहित मुलांनी अनुभवले. आज घराघरातून जलशुद्धीकरण उपकरणे असतात. तर ते कशा प्रकारे काम करते तेही मुलांना कळले. मुलांनी पाणबुडीच्यामागील विज्ञान समजून घेतले,   मुलांच्या कानावर ग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे शब्द पडत असतात. एका सत्रात मुलांना सूर्य, पृथ्वी, चंद्र केले गेले आणि वेगवेगळ्या ग्रहणांच्या वेळी त्यांची स्थिती कशी असते ते प्रात्यक्षिकासहित समजावून देण्यात आले.
एका सत्रात मुलांसाठी ऊर्जा विषयाअंतर्गत ऊर्जेचे मुख्य स्रोत, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, ऊर्जेचे विविध प्रकार, सौर, पवन, पाण्याच्या लाटांपासून निर्माण होणारी ऊर्जा, अणुऊर्जा इ. विषयीची माहिती देण्यात आली. ऊर्जाबचत, त्याचे महत्त्व यांविषयी मुलांशी संवाद साधण्यात आला.
गेल्या महिन्यात झालेल्या एका सत्रात मुलांनी कागदाचे विविध आकार तयार केले. त्यामुळे त्रिशंकू आणि त्रिकोण यांतला फरक, त्रिमिती संकल्पना इ. अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या.दुसऱ्या एका सत्रात स्वयंपाकघरातील उपकरणांचा म्हणजे कात्री, चिमटा, सांडशी, अडकित्ता इ. गोष्टींची रचना आणि त्यांचे कार्य समजावून दिले गेले. मुलांना निसर्गाची ओळख व्हावी म्हणून पावसाळ्यात आणि पाऊस कमी झाल्यावर येऊरला भ्रमंतीसाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि फुलपाखरे अनुभवण्यासाठी ठाणे (पूर्व) येथील उद्यानात नेण्यात आले होते. जानेवारी महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि घोडबंदर रोडवरील खाडी पाहण्यासाठी मुलांना नेण्यात येणार आहे.
हेमा आघारकर

छोटे न्यूटन हा उपक्रम रवि. सकाळी (८.३० ते ११.३० या वेळेत दोन गटांत) जिजामाता उद्यान, कोपरी ब्रिजखालील महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वरती असलेल्या हॉलमध्ये राबवला जातो. अधिक माहितीसाठी जिज्ञासा संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधता येईल- २५४०३८५७.