संस्था, कुटुंबीयांकडून सोहळा; आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन
सर्वसाधारणपणे कुणाच्याही वाढदिवशी त्याला शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र क्वचितच काही जणांच्या नशिबी असा योग येतो. त्यातही सहचारिणी, मुले, नातवंडे आणि पतवंडांसोबत शंभरी साजरी करण्याचे भाग्य दुर्लभच असते. येथील रघुनाथ टाकळकर ऊर्फ अप्पा यांच्या आयुष्यात मात्र गेल्या रविवारी हा योग जुळून आला. अप्पा आणि त्यांच्या पत्नी शशिकला हे दाम्पत्य अंबरनाथकरांचे सार्वजनिक आजी-आजोबा आहेत. त्यामुळे अप्पांच्या शंभरीचा सोहळा हा काही त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही. अंबरनाथमधील अनेक संस्था आणि व्यक्ती सहभागी झाल्या.
समर्थ रामदासांचे निस्सीम भक्त असलेले हे टाकळकर दाम्पत्य अंबरनाथच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. केंद्राच्या आयुध निर्माणी कारखान्यात सुरुवातीला ७० रुपये मासिक वेतन मिळणाऱ्या अप्पांना आता २५ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते. पुढील वर्षी शंभरी पूर्ण केल्यानंतर त्यांचे निवृत्त वेतन नियमानुसार दुप्पट होईल. अप्पांचे शंभराव्या वर्षांत पदार्पण झाल्यानिमित्त कुटुंबातील सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन सूर्योदय सभागृहात एक कौतुक सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त बोलताना अप्पांनी माणूस पैसा अथवा हुद्दय़ाने नव्हे तर स्नेहाने, प्रेमाने मोठा होतो, असे मत व्यक्त केले.
मित्रांसोबत कॅरम खेळण्यापेक्षा तब्बल ७१ वर्षांचे सहजीवन लाभलेल्या शशिकलासोबत पिक्चर पाहायला आवडेल, असे उत्तर देऊन ९९ वर्षांच्या अप्पा आजोबांनी ९४ वर्षांच्या शशिकला आजींना लाजवले. अप्पांनी लिहिलेल्या ‘माझा शंभर वर्षांचा प्रवास’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. कुटुंबीयांनी मोठय़ा हौसेने या दोघा ज्येष्ठांची यानिमित्ताने साखरेने तुला केली. ऊर्मी ग्रुप, प्रभात भ्रमण मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा आदी संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.