|| प्रशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्राणिक सेंटर’च्या उपक्रमाचा मुरबाड तालुक्यातील ७२६ कुटुंबांना लाभ

समाजातील दीनदुबळ्या आणि वंचित घटकांना किमान एकवेळ पोट भरता येईल, इतके सकस अन्न मिळावे यासाठी सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्न कितपत यशस्वी झाले, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र गरजूंच्या अन्नसुरक्षेचे उद्दिष्ट ठेवून दोन वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्य़ात लोकसहभागातून सुरू झालेल्या एका अभिनव चळवळीने ७२६ कुटुंबांपर्यंत महिन्याभराचे किराणा सामान पोहोचविले आहे.

आतापर्यंत मुरबाड तालुक्यात विविध ठिकाणी दीड महिन्यांच्या अंतराने ११ शिबिरे भरवून ही मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी लागणारे साडेनऊ लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा करण्यात आले. ठाण्यातील प्राणिक सेंटर या संस्थेने मुरबाड तालुक्यातील तरुणांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी ‘फूड फॉर हंग्री’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. गरजूंपर्यंत किराणा सामान पोहोचविणे हा या हेतू आहे. त्यासाठी निधी शहरातील नागरिक स्ववर्गणीद्वारे उभा करतात. गावपाडय़ांमध्ये सर्वेक्षण करून स्थानिक तरुण खऱ्या गरजू कुटुंबांचा शोध घेतात. दर दीड महिन्यानंतर एकदा किराणा मालाचे वाटप होते. आतापर्यंत या योजनेतून ११ शिबिरांद्वारे ७२६ कुटुंबांना किमान महिनाभराचे किराणा सामान पोहोचविण्यात आले आहे. गेल्या रविवारी धसईत किराणा, दिवाळी असल्याने कपडे देण्यात आले. लाभार्थीनी स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. वैशाखरे गावात शिक्षक असणारे विराज घरत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून साडेनऊ लाख रुपये गरजूंसाठी खर्च करण्यात आले आहेत.

मोहिमेचे फलित

या मोहिमेमुळे गावात एकीची भावना वाढीस लागली. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कातकरी उत्थान योजना राबवली. तेव्हा या योजनेतील तरुणांनी या भागातील कातकरी तरुणांचे सर्वेक्षण करून त्याची माहिती संकलित करून दिली. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदतीचे हात पुढे केले. वनराई बंधारे, सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधून नैसर्गिक जलस्रोत अडविण्याच्या काही योजना राबविल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social work in thane
First published on: 14-11-2018 at 03:33 IST