पक्ष्यांसाठी खाद्यघरटी उभारण्यात गृहसंकुलांचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगणातल्या झाडावर दिसणाऱ्या चिमण्या..घरामध्ये फोटोच्या आडोशाला किंवा भिंतीच्या कोनाडय़ाजवळ असलेली चिऊताईंची घरटी.. घराच्या अंगणात मूठभर कण टाकल्यावर येणारे चिमण्यांचे थवे..आपल्या लहान बाळाला चिमण्या भुर्रररकन उडत जाणाऱ्या दाखवत एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे म्हणत घास भरवणारी आई.. हे चित्र अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत दिसत होते. परंतु, अलीकडच्या काळात चिमण्या जणू नाहीशाच झाल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आपल्या पुढच्या पिढीला चिऊताई केवळ पुस्तकातच दिसेल, या भीतीने  ठाण्यातील काही गृहसंकुलांनी  चिमण्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे.’ अशी हाक देत अनेक ठिकाणी रहिवासी सोसायटीच्या आवारातील झाडांवर  ‘बर्ड फिडर’ म्हणजेच खाद्य घरटी ठेवत आहेत.

ठाणे सिटिझन फोरम या संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम येथील विविध गृहसंकुलांमध्ये राबविण्यात येत आहे. चिमण्यांची संख्या परत वाढावी, त्यांचा चिवचिवाट पुन्हा अवतीभोवती दिसावा, यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५० पक्षी खाद्य घरटी बसविण्यात आली आहेत. ठाण्यातील वेदान्त, लक्ष्मीनारायण, निळकंठ हाइट्स, सिद्धांचल यांसारख्या गृहसंकुलांमध्ये ही घरटी बसविण्यात आली असून बच्चेकंपनीने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविलेला पाहायला मिळाला. हा उपक्रम शहरभर राबविण्याचा संस्थेचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे सिटिझन फोरमचे अध्यक्ष कॅसबर ऑगस्टन यांनी दिली.

पक्षिमित्रांचे आवाहन

* घराजवळ किंवा मोकळय़ा जागांमध्ये, खिडकीत पक्षांना राहण्यासाठी लाकडांचे कृत्रिम बॉक्स लावणे तसेच घरामध्ये पडलेले मोकळे बॉक्स घराच्या गॅलरीत ठेवले तरी चिमण्यांची राहण्याची सोय होईल.

* फ्लॅट, घराच्या समोर अथवा खिडकीत चिमण्यांसाठी दाणापाणी ठेवा.

* घराजवळ वृक्षांची लागवड करणे. मोठय़ा आवाजाचा पक्ष्यांना त्रास होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

* चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभियान सुरू करण्याची गरज वृक्षतोड नियंत्रित करणे. तसेच जखमी पक्ष्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे, अशी माहिती पक्षिमित्र पराग शिंदे याने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sparrow breeding project bird feeders in thane housing societies bird feeders sparrow
First published on: 28-02-2017 at 01:05 IST